पुणे: अंमलबजावणी संचलनालयाकडून पुण्यातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर छापे टाकल्याची चर्चा दिवसभर होती, मात्र यासंदर्भात नेहमीप्रमाणेच अंमलबजावणी संचलनालयाच्या वतीने कसलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वक्फ बोर्डाच्या पुण्यातील मालमत्तांच्या विक्रीमध्ये गैरव्यवहार असल्याची तक्रार करणाऱ्यांनाही याची काहीच माहिती नाही.
तक्रारदार असलेले मुश्ताक अहमद फकरुद्दीन शेख यांनीच ही माहिती दिली. त्यांनी तसेच मुन्वरखान नन्हे खान यांनी इडीच्या मुंबईतील कार्यालयात वक्फ बोर्डाच्या पुण्यातील जमिनी काहीजणांकडून कवडीमोल किंमतीत विकत असल्याची लेखी तक्रार केली आहे. त्यात हिंजवडी येथील एक मालमत्ता तसेच एका प्रसिद्ध दर्ग्याच्या मालमत्तेचा समावेश आहे.
मुश्ताक शेख यांनी सांगितले की, आपण स्वत: ३ नोव्हेंबरला इडीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन पुण्यातील गैरव्यवहारांबाबत लेखी तक्रार केली आहे. त्यावेळी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्याकडे चार तास चौकशी केली. सर्व जागांचे पत्ते घेतले, माहिती विचारली. काहीजणांची नावे विचारली. त्यानंतर त्यांच्याकडून यासंदर्भात काय कार्यवाही झाली याबद्दल मात्र मुश्ताक यांना काहीही माहिती नाही. पुण्यात इडीचे पथक आले होते का, त्यांनी काही ठिकाणी जाऊन चौकशी केली का, तुमच्याबरोबर संपर्क साधला का यावर मुश्ताक यांनी असे काहीही झाले नसल्याचे ठामपणे सांगितले.
आमच्या तक्रारीची दखल घेऊन असे काही झाले असेल तर ते चांगलेच आहे, त्यातून वक्फ बोर्डाच्या मालमत्तांबाबत काय चालले आहे ते सत्य बाहेर येईल असे त्यांनी सांगितले. वक्फ बोर्ड व त्यांच्या मालमत्ता अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. या खात्याचे मंत्री नबाब मलिक काय आरोप करतात, त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने काही कार्यवाही झाली का याबाबत काहीही बोलायचे नसल्याचे मुश्ताक म्हणाले. दरम्यान मंत्री नबाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण स्वत:च वक्फ बोर्डाच्या मालमत्तांबाबत संवेदनशील असून इडीकडून अशी काही चौकशी वगैर झाली असेल तर त्याचे स्वागतच करत असल्याचे सांगितले आहे.