पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याच्या प्रकरणाची चौकशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे सोपविली असून, त्यांना ६ दिवसांमध्ये याप्रकरणाचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. शहरातील पाण्याच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या भवनरचना विभागाकडून हा प्रकार घडूनही, त्यांच्याकडून अद्यापही याप्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. शहरामध्ये बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई असताना, महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठीच पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी उजेडात आणला आहे. महापालिकेमध्ये गुरुवारी झालेल्या मुख्य सभेत शहरात पाण्याची नासाडी होत असल्याच्या प्रकाराविरुद्ध नगरसेवकांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्तकेली आहे. आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणी मनसेचे सभासद बाळा शेडगे यांनी केली. महापालिका प्रशासनाकडून इमारतीच्या बांधकामासाठी झऱ्याचे पाणी वापरले जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात नळाला टॅप करून, पाइपने बांधकामाला पाणी मारले जात असल्याचे दिसून आले होते. त्याचे फोटोही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी काढले आहेत. पाणीटंचाईच्या झळा वाढल्याने नुकतेच शहरातील सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम, वॉशिंग सेंटरसाठी करण्यास सक्तमनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहने अशा प्रकारे गैरवापर होत असल्याचे आढळून आले. त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून, त्यांनी गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे. महापालिकेच्या इमारतीच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरल्याच्या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांना येत्या ६ दिवसांत याबाबतची चौकशी करून, अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.- कुणाल कुमार, आयुक्त
६ दिवसांत करणार चौकशी
By admin | Published: March 18, 2016 3:16 AM