पुणे : अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच खा. अनिल शिरोळे ह्यांनी ससून रुग्णालयाच्या काही प्रमुख विभागांना भेट देऊन तेथील कार्यपद्धत व अडचणी समजावून घेतल्या. अचानक दिलेल्या ह्या दोन तासांच्या भेटीमध्ये बाह्य रुग्ण/ केस पेपर विभाग, औषध विभाग , रक्त संकलन केंद्र, लिनेन विभाग, एमआरआय व सिटी स्कॅन विभाग, डेड हाऊस, शवविच्छेदन विभाग, भाजलेले रुग्ण विभाग, कचरा निर्मूलन विभाग ह्या विभागांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान त्यांच्याबरोबर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोवाळे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अजय तावरे व डॉ. यलप्पा जाधव व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितिन हिवाळे हे ससून प्रशासनातर्फे उपस्थित होते.सद्यस्थितीत उपलब्ध मनुष्यबळ व साधनांचा योग्य पद्धतीने वापर करणे, औषध विभागातील रुग्णांना कागदाच्या पुडीमध्ये औषध न देता स्ट्रिपच्या स्वरुपात देणे अथवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये देणे, तसेच रूग्णाला औषध देताना कुठली गोळी किती वेळेला घ्यावी याची माहिती लिखित स्वरुपात देणे, औषध स्टोरेज करणाऱ्या विभागात एअरकंडिशनची सुविधा पुरवणे, साहित्य ठेवण्यासाठी कपाटांची संख्या वाढविणे या प्रमुख सुविधांबरोबर रक्तसंकलन केंद्राखालील रिकाम्या जागी असणारा तसेच लिफ्टच्या रिकाम्या डक्टमधील कचरा हटविणे आदी सूचना शिरोळे यांनी ससून प्रशासनास केल्या.
ससून रुग्णालयात खासदारांकडून पाहणी
By admin | Published: October 01, 2015 1:11 AM