पुणे : तळजाई टेकडीवर 108 एकरात उभारण्यात येत असलेल्य उद्यानासह तेथील समस्यांची पाहणी महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांनी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेण्यात आल्या. टेकडीच्या विकास आराखड्यासह भूसंपादन, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले खटले, पार्किंगची समस्या आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
तळजाई टेकडीवर फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यासोबतच येथे उभारण्यात आलेल्या क्रिकेट मैदानावरही मोठ्या प्रमाणावर तरुण खेळण्याकरिता येत असतात. टेकडीवर सध्या प्रशस्त रस्ते जरी झालेले असले तरी पर्यावरणाची हानी होऊ नये याकरिता नागरिक जागरुक असतात. गेल्या काही दिवसांपासून तळजाई टेकडीवर पार्किंग उभारण्यावरुन वाद निर्माण झाले आहेत. नागरिकांनी व काही संघटनांनी मधल्या काळात पार्किंगला विरोध करीत स्वाक्षरी मोहिम राबविली होती. तर काही नगरसेवक पार्किंग करण्याबाबत आग्रही आहेत.
यासोबतच टेकडीवर पाण्याची समस्या आहे. येथे काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाºयांना पिण्यासाठी पाणी नाही. तसेच स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची कुचंबना होत आहे. मंगळवारी पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी तळजाई टेकडीला विविध विभागाच्या अधिकाºयांसह भेट दिली. त्यांच्यासोबतच येथील समस्यांविषयी चर्चा केली. टेकडीचा विकास आराखडा कसा आहे, त्याची नेमकी कशी अंमलबजावणी सुरु आहे याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच काही जागा मालक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आहेत, त्या खटल्याची सद्यस्थिती काय आहे, भूसंपादनाची सद्यस्थिती कशी आहे याबाबतही चर्चा करण्यात आली.
टेकडीच्या सीमेवर अतिक्रमण होण्याचा धोका असून येथे सीमाभिंत बांधून टेकडी सुरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे आदी विषयांवर देखील चर्चा झाली. काही ज्येष्ठ नागरिकांनी टेकडीवर पार्किंगची व्यवस्था करावी अशी विनंती केल्याचे अगरवाल यांनी सांगितले. अगरवाल यांच्याकडे परिमंडल एक आणि चारची अतिरीक्त जबाबदारी आहे. त्यामुळे याभागातील समस्या जाणून घेण्यासाठी या आठवड्यात सर्वत्र भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.