बारामती: शहरातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता बारामती नगरपालिकेने आता शहरातील प्रत्येक नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्याचा निर्णय घेत शनिवारी त्या पध्दतीने दहा प्रभागातील जवळपास १४ हजारांवर नागरिकांची तपासणी केली. उपनगराध्यक्ष अभिजित जाधव व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या बाबत आज माहिती दिली. शहरातील सव्वा लाखाहून अधिक नागरिकांची यात तपासणी केली जाणार आहे.
गुजर म्हणाले, ज्या नागरिकांना थंडी, ताप, सर्दी खोकला, घसा खवखवणे यासारखी लक्षणे असतील त्यांचे तातडीने स्वॅब घेऊन तपासणी करण्याचा आज प्रयत्न केला गेला. ज्या प्रभागात २५ हून अधिक कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत, त्यावर आज लक्ष केंद्रीत केले गेले. एका प्रभागात वीस टीम कार्यरत करुन प्रत्येक टीममध्ये किमान दोन जण अशा पध्दतीने तपासणी केली गेली. आज एकाच दिवशी १८० टीमच्या माध्यमातून तपासणी केली गेली. क्षेत्रीय अधिकारी, आशा वर्कर व सामाजिक कार्यकर्ते अशा एकूण सहाशे जणांनी आज एकाच वेळेस तपासणी कार्यक्रम राबविला. दरम्यान काल संध्याकाळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्वता: कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत प्रशिक्षण घेतले. आजपासून जे बारामतीकर पॉझिटीव्ह आले आहेत त्यांच्या घरी जाऊन सखोलपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले गेले. दरम्यान आजपासून बारामती शहरात निजंर्तुकीकरण मोहिम सुरु करण्यात आली असून अनेक ठिकाणी आज फवारणी केली गेली. पुढील तीन दिवसात पूर्ण शहरात ही फवारणी करण्याचे नगरपालिकेचे उद्दीष्ट असल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले. दरम्यान या तपासणीमध्ये एखादा नागरिक हाय रिस्कमधील वाटल्यास त्याला थेट रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेले जात आहे. आज सकाळच्या सत्रात अशा १५ जणांना तपासणीसाठी पाठविले गेले. जे घरी उपचार घेत आहेत आणि जे कोरोना निगेटीव्ह झालेले नाहीत अशा सर्वांना आता रुग्णालयात पाठवले जाणार आहे.
रुग्णसंख्या वाढू लागलीय..
बारामती मेडीकल कॉलेजमधील २००, नटराजचे कोविड सेंटर १०० व महिला प्रेरणा वसतिगृहात ५० असे जवळपास ३५० लोक सध्या उपचार घेत आहेत. या शिवाय खाजगी दवाखान्यातील रुग्णांची असलेली संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढल्यास माळेगाव येथील वसतिगृहात रुग्णांची निवास व इतर व्यवस्था केली जाणार आहे.
-------------------------
बारामती शहरात घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी नागरिकांची तपासणी करीत आहेत.
२० बारामती-०९
----------------------------