पुणे : पुणे महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या संभाव्य जागांची पाहणी नुकतीच राज्याच्या मेडीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी केली़
पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी आवश्यक जागांमध्ये डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय, स्व. बाबूराव सणस कन्याशाळा आणि सारसबागेजवळील सणस स्पोर्ट ग्राउंडमधील हॉस्टेलचा समावेश आहे. या सर्व जागांची पाहणी होताना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाकरिता आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू करता यावी, यादृष्टीने कमला नेहरू रुग्णालय, वर्गखोल्यांसाठी जवळच्याच स्व. बाबूराव सणस शाळेतील वर्गखोल्या व विद्यार्थी वसतीगृहासाठी सणस स्पोर्टस ग्राउंड येथे खेळाडूंसाठी उभारण्यात आलेले वसतीगृह वापरण्यात येणार आहे. मेडीकल एज्युकेशनच्या अधिकाऱ्यांना या जागा व इमारती दाखविण्यात आल्या असून, नियम व अटींनुसार आवश्यक माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
---------------------------