पुणे : ‘महापालिकेची रुग्णालये ही सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी उभारली आहे. काही कमी असेल तर आम्हाला सांगा, आम्ही सोय करून देऊ, मात्र रुग्णांना दर्जेदार सेवा द्या,’ असे आवाहन महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना केले.
महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले, उपाध्यक्ष दिशा माने तसेच रूपाली धाडवे, मनीषा लडकत, गायत्री खडके, वृषाली चौधरी, फरजाना शेख, किरण जठार तसेच स्थानिक नगरसेवक अश्विनी लांडगे, अनिल साळवे, श्वेता चव्हाण यांनी शनिवारी सकाळी भेट दिली व तेथील सेवा-सुविधांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे हेही होते. रुग्णालयातील अनेक विभागांना या पथकाने भेट दिली व थेट रुग्णांशीच संवाद साधत पाहणी केली.
बहुसंख्य रुग्णांनी औषधे मिळत नसल्याची तक्रार केली. स्वच्छता नसते, डॉक्टर नियमित येत नाहीत, तपासण्या वेळेवर केल्या जात नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. त्यानंतर या पथकाने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाºयांबरोबरही चर्चा केली. सर्वसामान्य कुटुंबांना महागडी खासगी वैद्यकीय सेवा परवडत नाही. त्यासाठी म्हणून महापालिकेची आरोग्य सेवा आहे. त्याचा सगळा खर्च महापालिका करते. तरीही अपेक्षित लाभ रुग्णांना मिळत नसेल तर ते योग्य नाही. तुमच्या अडचणी असतील तर आम्हाला सांगा, त्या निश्चित सोडवण्यात येतील, मात्र रुग्णांना देण्यात येणाºया सेवेत कमतरता ठेवू नका असे आवाहन भिमाले व महिला बाल कल्याण समितीने सर्वांना केले.राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे प्रतिष्ठेचे रुग्णालय आहे. त्याच्या विस्तारीकरणाचा विचार सुरू आहे. कोणत्याही स्थितीत रुग्णालयाचे खासगीकरण करणार नाही. हे रुग्णालय चांगले व्हावा, तिथे आधुनिक उपकरणे यावीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील.- श्रीनाथ भिमाले,सभागृह नेते, महापालिका