लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेकडून तब्बल ४५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्तेची दररोज तपासणी केली जाते. पाणी शुद्ध आणि पिण्यालायक करण्यासाठी अनेक चाचण्या घेतल्या जात असून, तासाला बारा नमुन्यांची तपासणी केली जाते. पावसाळ्याच्या तोंडावर विशेष खबरदारी बाळगली जाते.
खडकवासला धरणातून येणारे पाणी पालिकेच्या पर्वती, लष्कर जलकेंद्रांवरून शहरभर पोहोचवले जाते. या पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्याची अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. येथे दिवसाला २५० ते ३०० म्हणजे दर तासाला सुमारे बारा पाण्याचे नमुने गोळा केले जातात. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते आहे. घरोघरी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळकोंडाळे, पाण्याच्या टाक्या, जलशुुद्धीकरण केंद्र आणि शुद्धीकरणानंतर बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचेही नमुने घेतले जातात.
पाण्यातील रसायने, धातू, कीटकनाशकांची मात्रा किती प्रमाणात आहे हे भारतीय मानक ब्यूरो, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार तपासले जाते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारी पुणे ही राज्यातील एकमेव पालिका आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या मानकानुसार दहा हजार लोकसंख्येमागे महिन्याकाठी एक नमुना घेणे आवश्यक आहे. पुण्याची लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात गृहीत धरून ४५० नमुने महिन्याला घेणे अपेक्षित आहे. परंतु, मात्र महिन्याकाठी ७ हजारांच्या आसपास नमुने तपासले जात आहेत.
===
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर मुख्य प्रयोगशाळा आहे. तर, लष्कर जलकेंद्रावर कमी क्षमतेची प्रयोगशाळा आहे. पुणेकरांना होणारा पाणीपुरवठा सुरक्षित असावा, त्यामधून कोणत्याही स्वरूपाचे आजार पसरू नयेत, याची काळजी घेतली जाते आहे. पाण्यातील कीटकनाशकांचे प्रमाण ‘निरी’ येथून आणि किरणोत्सर्जन करणाऱ्या पदार्थांची तपासणी भामा ऑटोमिक सेंटरमधून वर्षातून एकदाच केली जाते.
===
पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन, ब्लिचिंग पावडर, तुरटीसह वापरण्यात येणाऱ्या अन्य रसायनांचे प्रमाण यांत्रिक पद्धतीने तपासले जाते. पाण्यात आढळून येणारे आर्सेनिक, झिंक, लोह आदी २१ प्रकारच्या धातूंचे प्रमाण अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने तपासले जाते.
===
पाण्यातील ‘टोटल ऑर्गेनिक कार्बन’, पाण्याची ‘टर्बिडीटी’ अर्थात गढूळता आणि पाण्यातील जिवाणूंचे प्रमाण हेही निकषांप्रमाणे असल्याचे पाहिले जाते. पाणी दूषित असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित विभागातील जलवाहिन्या, पाणीपुरवठा केंद्रांच्या मुख्य स्त्रोताची तपासणी करून पाणी दूषित होण्याचे कारण शोधून ते दुरुस्त केले जाते.