पुणे : नोटाजप्तीच्या प्रकरणामध्ये कोथरूड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकासह चार कर्मचारी निलंबीत झाले... जुगार अड्ड्यावरून जप्त केलेली रोकड गडप केल्याच्या प्रकरणात दिघी पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक आणि कर्मचारी निलंबीत झाले... शिस्तीचा बडगा उगारीत अशा कारवाया पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून सुरू असतानाही काही पोलीस अधिकारी अजुनही हप्त्यांसाठी लोकांना त्रास देत आहेत. लष्कर पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाने हप्ता द्यावा, यासाठी हॉटेलचालकाला शिवीगाळ करीत कारवाईची धमकी दिली आहे. यासोबतच पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांना जाऊन सांग मी हप्ता मागितला, अशी अरेरावीची भाषाही हा उपनिरीक्षक वापरीत असल्याच्या दोन आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पोलीस खरेतर जनतेचे आणि त्यांच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी आहेत. मात्र, तेच जेव्हा लोकांच्या खिशाला कात्री लावू पाहतात, तेव्हा दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण होतो. लष्कर भागातील एम. जी. रस्त्यावर असलेले एक हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी सेंटर स्ट्रीट चौकीमध्ये नेमणुकीस असलेला हा उपनिरीक्षक हॉटेलचालकाला दरमहा हप्ता देण्याची मागणी करीत होता. हप्ता सुरू केला नाही, म्हणून हा उपनिरीक्षक थेट कारवाई करण्यासाठी हॉटेलवर पोचला. तेथून फोन करून मालकाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. अर्वाच्च भाषेतील या शिव्या खाऊनही हॉटेलचालक त्याला पैसे देण्यास तयार आहे, असे वारंवार सांगत होता. मात्र, पोलीस आयुक्त, सह आयुक्त कोणालाही जाऊन सांग मी पैसे मागितले, अशी मग्रुरी दाखवित धमकावत होता. माझ्या सोबतच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना पैसे देतोस, कर्मचाऱ्यांना पैसे देतोस, मला का देत नाहीस, असे दरडावून विचारीत होता. एका जबाबदार अधिकाऱ्याने अशा प्रकारे व्यावसायिकांना धमकावणे ही बाब सर्वसामान्यांच्या मनामध्ये पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी आहे. कारवाईला घाबरून अनेक व्यावसायिक हप्तेखोरीविरोधात तक्रार करायला धजावत नाहीत. सध्या शहर पोलीस दलाची अवस्था ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’, अशी झालेली आहे. लोकांना नाडून, त्यांची अडवणूक करीत पैसे उकळण्याचे आणि स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे हे प्रकार कधी थांबणार, हा प्रश्न आहे. वास्तविक कोथरूड आणि दिघी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतरही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाडस होतेच कसे, हा प्रश्न आहे. हॉटेलचालक आणि या उपनिरीक्षकामध्ये फोनवर झालेल्या संभाषणाच्या दोन आॅडिओ क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागल्या आहेत. अत्यंत उर्मट, अर्वाच्च भाषेत हॉटेल चालकाशी झालेला संवाद या क्लिपमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. थेट पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनाही न घाबरणारे असे अधिकारी जनतेचे रक्षण कसे करणार, हा प्रश्न आहे. आता या प्रकरणावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
पोलीस उपनिरीक्षकाची अरेरावी व्हायरल
By admin | Published: April 10, 2017 3:11 AM