पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातील (बालभारती) कार्यालय सचिव पदावर काम करणाऱ्या नीलिमा नाईक यांची बदली करावी, या मागणीसाठी बालभारतीच्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांनी बालभारतीचे संचालक चंद्रमणी बोरकर यांना घेराव घातला. अखेर संचालकांनी नाईक यांच्याकडून कार्यालय सचिव पदाचा कार्यभार काढून घेतला.बालभारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी बदली केली जाते. परंतु, नाईक या गेल्या सहा वर्षांपासून एकाच पदावर होत्या. कर्मचारी संघटनांनी अनेक वेळा संचालकांशी चर्चा केली होती. परंतु, नाईक यांची बदली होत नव्हती. त्यामुळे बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांनी संचालकांना दुपारी तीन वाजल्यापासून घेराव घतला. बदलीचा निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यामुळे संचालकांनी नाईक यांच्याकडे असलेला पदभार काढून स्वत:कडे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडले. घडलेल्या प्रकाराबद्दल बोरकर यांनी बोलणे टाळले. (प्रतिनिधी)
बालभारतीच्या संचालकांना कर्मचा-यांचा घेराव
By admin | Published: August 28, 2014 4:22 AM