पुणे : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूरच्या भूकंपग्रस्त भागातील मुलांचा सांभाळ करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. ही संघटना संकटात सापडलेल्या लोकांच्या पाठीशी उभी राहते. हे काम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शासनाकडून संकटकाळात मदत दिली जाते. मात्र, समाजाचा हातभार लागत नाही तोपर्यंत त्या कामाला गती येणार नाही, असेही पवार म्हणाले.भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाबूराव पाचरणे, जगदीश मुळीक, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था व अन्य मान्यवर उपस्थित होते.राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्यामुळे दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या समितीतील सदस्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, समितीकडून राज्य व केंद्र सरकारला योग्य अहवाल सादर केला जाईल. राज्यातील लोकप्रतिनिधीही केंद्रात याप्रश्नी पाठपुरावा करतील. आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिलेली आहे, असे सांगून ते म्हणाले, संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. बापट म्हणाले, की मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकविणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शासनाच्या मदतीला मर्यादा असतात. परंतु, शासनाची मदत न घेता उपकाराच्या नाही, तर कर्तव्याच्या भावनेतून बीजीएस काम करत आहे.
जैन संघटनेचे काम प्रेरणादायी
By admin | Published: November 23, 2015 2:07 AM