अमेरिका, पाकिस्तानमुळेच तालिबानी सत्ता : पुण्यातले ४ हजार अफगाणी चिंतातुर
राहुल शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या आठ दिवसांपासून आमचा आई-वडिलांशी संपर्क नाही...आम्हाला स्वत:चा देशच राहिला नाही...अफगाणिस्तानात परतलो आमची हत्या होण्याची भीती...तालिबानी राजवटीत महिलांना तर घराबाहेरच पडता येणार नाही...त्यामुळे आता जावे कुठे, जगावे कसे, कुटुंबीयांशी झालेली ताटातूट संपणार कधी...ते असतील तरी कुठे...कसे....अशा अनेक प्रश्नांनी पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांचे चेहरे काळवंडले आहेत.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर जगभरात विखुरलेले अफगाणी नागरिक चिंता, काळजीत बुडून गेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये सध्या सुमारे ४ हजार अफगाणिस्तानी विद्यार्थी शिकत आहेत. “अमेरिका व पाकिस्तानसारख्या देशांमुळेच अफगाणिस्तानला हा दिवस पाहावा लागला,” अशी संतप्त भावना यातील काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
काही अफगाणी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या. त्यांचे म्हणणे आहे की, सध्या अफगाणिस्तान पूर्णपणे अस्थिर आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. केव्हाही आपली हत्या केली जाऊ शकते, या भीतीने अफगाणी लोक इतर देशांमध्ये आश्रयासाठी जात आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून अफगाणिस्तानातले मोबाईल बंद आहेत. इंटरनेट नेटवर्क नाही. त्यामुळे आम्हाला पालकांशी, कुटुंबीयांशी संपर्कही साधता आलेला नाही. ते सुरक्षित आहेत की नाहीत हेही माहिती नाही. शिक्षण घेऊन पुन्हा मायदेशी परतावे आणि नोकरी करून कुटुंबाला हातभार लावावा, या अपेक्षेने आम्ही पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलो होतो. पण आता पुन्हा अफगाणिस्तानात परतलो तर आम्ही जिवंत राहू की नाही हेही सांगता येत नाही.
चौकट
महिला बंदिवान झाल्या
“तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यामुळे तिथल्या महिलांना आता केवळ बुरखा परिधान करून जीवन जगावे लागेल. सुरक्षा देण्यासाठी म्हणून पुरुषाची सोबत घेतल्याशिवाय आम्हाला घराबाहेर पडू दिले जाणार नाही. महिलांना कुठलेही स्वातंत्र्य उरलेले नाही. आम्हाला स्वत:चे घर राहिले नाही. त्यामुळे भारत सरकारने आता आम्हाला शिक्षण व सुरक्षेबाबत मदत करावी.”
- अझिझा, अफगाणी विद्यार्थिनी
चौकट
आता ‘घर’ भारतातच
“अफगाणिस्तानमध्ये सध्या काय चालू आहे हे सांगताच येत नाही. आम्ही पुन्हा घरी परत जाऊ शकू किंवा नाही, हेसुध्दा माहीत नाही. शिक्षणासाठी भारतात आलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिसा संपला असेल तर त्यास मुदतवाढ देऊन आम्हाला येथेच राहण्याची परवानगी द्यावी, अशी आम्हा विद्यार्थ्यांची भारत सरकारला नम्र विनंती आहे.”
-फरझाना, अफगाणी विद्यार्थी
चौकट
तालिबान्यांनी मारले
“अफगाणिस्तानातली परिस्थिती भयानक असून तालिबान्यांनी माझ्या काकांना मारले आहे. ‘आम्ही तुम्हाला येथे स्वातंत्र्य देऊ,’ असे तालिबानी म्हणतात. परंतु, यापुढे महिलांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडायचे असेल तर पती, भाऊ किंवा मुलाची सोबत हवी, अशी नोटीस त्यांनी जाहीर केली आहे. यापुढे अफगाणिस्तानात काय होईल हे सांगता येत नाही. मी अफगाणिस्तानातल्या हैरतचा रहिवासी असून आमचा पासपोर्ट रद्द होऊ नये, अशी अपेक्षा.”
-झायक फैझ, अफगाणी विद्यार्थी
चौकट
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणासाठी येणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे दोनशे ते अडीचशे विद्यार्थी विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. यातल्या काही विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहात प्रवेश मिळतो.”
- डॉ. विजय खरे, संचालक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
चौकट
विद्यापीठातील अफगाणी विद्यार्थ्यांची संख्या
वर्ष विद्यार्थी संख्या
२०१८-१९ १८३
२०१९-२० १५४
२०२०-२१ २१७
२०२१-२२ ५९८