पुणे : पूर्वी पालक मुलांच्या हाती सकस, उद्बोधक तसेच बुद्धीला व कल्पनाशक्तीला चालना देणारे साहित्य हातात कसे पडेल याबाबत जागरूक होते. त्यामुळेच मला देखील वाचनाची गोडी लागली. आजच्या काळात नवीन तंत्रज्ञानामुळे वाचन सहज आणि सोपे झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाशी भांडत बसण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करून पुढे जायला हवे, असे मत अभिनेत्री अमृता सुभाष हिने व्यक्त केले.
रोहन प्रकाशनच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन अभिनेत्री अमृता सुभाष आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या हस्ते झाले. रोहन प्रकाशनचे संचालक प्रदीप आणि रोहन चंपानेरकर उपस्थित होते.
अमृता सुभाष म्हणाल्या, आमच्या आधीची पिढी ही पूर्णत: हातात पुस्तके घेऊन वाचणारी होती आणि आमच्या पिढीच्या वाचनाची सुरुवात देखील याच पद्धतीने झाली. आता ती डिजिटलकडे सरकली आहे. त्याअर्थी आमची पिढी त्या स्थित्यंतराची पहिली साक्षीदार ठरली आहे. काळानुरूप होणाऱ्या या बदलांशी समरस होणे आणि मनात शल्य न बाळगता ’कालाय तस्मै नम: ’तत्त्वानुसार पुढे जाणे हा पर्याय आपल्यासमोर आहे.
कुंडलकर म्हणाले, रोहन प्रकाशनच्या या संकेतस्थळामुळे एक आश्वासक व्यासपीठ निर्माण झाले असून, जोवर चांगले लेखक हयात आहेत, तोवर त्यांच्या प्रकट मुलाखती घेऊन त्यांच्या साहित्याबाबत सविस्तर चर्चा होऊन त्याचाही समावेश या संकेतस्थळावर करावा. समाजमाध्यमांवर उपलब्ध साहित्याच्या भडिमारामुळे तरुण पिढी भरकटते आहे की काय अशी शंका येते.
---------------------------------------
’रोहन साहित्य मैफल’ची ही जणू विस्तारित डिजिटल आवृत्ती होय. यात आमच्या पुस्तकांची सविस्तर माहिती, वाचनीय मजकूरही असणार आहे. ‘मैफल एक्सक्लुझिव्ह’ विभागात मान्यवर लेखक, तज्ज्ञ मंडळी, अभ्यासकांची वैशिष्ट्यपूर्ण सदरे, मान्यवरांचे लेखक, तज्ज्ञांचे विचार तसेच तरुण लेखकांचे साहित्य येथे वाचता येईल. ही सदरे चार, आठ, बारा लेखांची असतील व साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक अशा प्रकारे ती प्रकाशित होत राहतील. वाचकांना दर आठवड्याला दोन-तीन नवे लेख वाचायला मिळतील. या प्रकारे वाचकांना उत्तम पुस्तकांबरोबर आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलवर सहजरीत्या वाचन करता येईल, अशी माहिती रोहन चंपानेरकर यांनी दिली.
-----------------------------