पुणे : नागपूर आणि आंबट-गोड संत्रा हे समीकरणच आहे. त्यामुळे संत्रा म्हटले की, नागपूरचे नाव डोळ्यांसमोर येते. मात्र सद्य:स्थितीत राजस्थान येथून आलेली संत्री ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे बाजारात नागपूरच्या संत्रांऐवजी राजस्थानच्या संत्र्याला अधिक मागणी होत असून, या संत्र्याला ग्राहकांची पसंती अधिक मिळत आहे.मार्केट यार्ड फळबाजारात १५ दिवसांपासून १० ते १५ टन राजस्थान संत्र्यांची आवक होत आहे. ही संत्री नागपूर संत्र्यांच्या तुलनेत आकाराने लहान आहेत. ती रंगाने नारंगी असून चवीला गोड आहे. त्यामुळे राजस्थान येथून आलेल्या संत्र्यांची रोजच्या रोज विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.राजस्थान येथून विक्रीसाठी आलेल्या संत्र्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २० ते ५० रुपये भाव मिळत आहे. या संत्र्यांचा हंगाम डिसेंबरअखेर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. सध्या बाजारात राजस्थान संत्र्यांसह नागपूर, अमरावती येथून संत्र्यांची आवक होत आहे. बाजारात रोज ३० ते ५० टनांची आवक होत आहे. सद्य:स्थितीत संत्र्यांचा बहर सुरू आहे. हा बहर आणखी दीड महिना सुरू असणार आहे. अमरावतीचा संत्रा आकाराने मोठा आहे. या संत्र्याची साल जाड असून चव आंबट-गोड आहे. तसेच रंगाला हा संत्रा हिरवा आहे. त्यामुळे या संत्र्याचा दर कमी असला, तरी राजस्थाच्या संत्र्याला मागणी अधिक आहे.मृगबहरात दर चांगले जानेवारीच्या १५ तारखेनंतर मृगबहर हंगाम सुरू होणार आहे. या हंगामात संत्र्याची मोठ्या प्रमाणात आवक होईल. हा हंगाम जानेवारी ते एप्रिलपर्यंत असतो. मृगबहर या हंगामात शहरासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात संत्र्याला मागणी वाढत असते. त्यामुळे दरही चांगले असणार आहेत.
मार्केट यार्ड बाजारात सद्य:स्थितीत संत्र्यांचे घाऊक बाजारातील दर मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. अमरावती संत्रा हा जाड साल आणि चवीला आंबट-गोड आहे. तसेच रंगाला हा संत्रा हिरवा आहे; तर राजस्थानी संत्रा हा चवीला गोट आणि रंगाने नारंगी असून चवीला गोड आहे. आकाराने लहान असल्याने राजस्थानी संत्र्याला मागणी चांगली आहे. - सोनू ढमढेरे, संत्रा अडते, मार्केट यार्ड