पुणे : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाढत्या कारवायांमुळे धास्तावलेल्या लाचखोरांनी लाच घेण्यासाठी आता नवा मार्ग स्वीकारला आहे. मध्यस्थीसाठी ते खासगी व्यक्तीकडून व्यवहार करु लागल्याचे दिसू लागले आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून २५ हजार रुपये घेताना एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तुषार बनकर (वय ३०, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तुषार बनकर हा आपला इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय असल्याचे सांगतो. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ४२ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली होती. तक्रारदार याच्याविरुद्ध फसवणुकीचा ऑनलाईन तक्रार अर्ज भारती विद्यापीठ पोलिसांकडे दाखल होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे होती. तक्रारदार यांच्याशी तुषार बनकर याने संपर्क साधला. संजय नराळे यांना सांगून या प्रकरणात मदत करण्यासाठी व प्रकरण मिटविण्यासाठी बनकर याने नरळेयांच्याकरीता १ लाख रुपयांची लाच मागितली.
या तक्रारीची १३ व २० फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. बनकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांनी आपल्याकडे इतके पैसे आता नाहीत, असे सांगितल्यावर त्याने टप्प्याटप्प्याने देण्यास सांगितले. त्यानुसार पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये घेण्याची बनकर याने तयारी दर्शविली. त्यानुसार सुखसागरनगर पोलिस चौकीसमोरील श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर येथे सापळा लावण्यात आला. तक्रारदार याच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारताना बनकर याला पकडण्यात आले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करीत आहेत.
जागेसंबंधात फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकरीता ५ लाख रुपयांची मागणी केली गेली. त्यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना खासगी व्यक्ती ओंकार भरत जाधव (रा. वाकड, मुळ अकोले, जि. अहमदनगर) याला १७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर खासगी व्यक्तीमार्फत लाच स्वीकारण्याचा दुसरा प्रकार समोर आला आहे.