Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका
By प्रशांत बिडवे | Updated: November 17, 2024 17:41 IST2024-11-17T17:39:57+5:302024-11-17T17:41:33+5:30
सत्तेच्या १० वर्षांच्या कार्यकाळात काय केले ते त्यांनी सांगावे, त्यातील चुका आम्ही सांगू. हेच निवडणुकीमध्ये अपेक्षित असते.

Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका
पुणे: निवडणुकीत केलेल्या कामांवर बोलणे अपेक्षित असते. भारतीय जनता पक्षाला मात्र कोणत्याही निवडणुकीत पाकिस्तान, मशिद, राममंदिर याशिवाय दुसरे मुद्दे सुचत नाहीत. बटेंगे तो कटेंगे कशासाठी म्हणता? त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा अशी टीका सचिन पायलट यांनी भारतीय जनता पक्षावर केली.
महाविकास आघाडीच्याकाँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पायलट यांनी काँग्रेसभवनमध्ये रविवारी दुपारी पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष अऱविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहमंद, पक्षाचे निरिक्षक टी.एस. सिंगदेव, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, युवक काँग्रेसचे सौरभ अमराळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पायलट म्हणाले, सत्तेच्या १० वर्षांच्या कार्यकाळात काय केले ते त्यांनी सांगावे, त्यातील चुका आम्ही सांगू. हेच निवडणुकीमध्ये अपेक्षित असते. कोणती कामे केली हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे भाजपचे नेते निवडणुकीत नेहमीच हिंदु मुस्लिम मुद्दे आणत असतात. महाराष्ट्रात ते हेच करत आहेत. वास्तविक राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहे. इथले उद्योग बाहेर नेले जात आहेत. बेरोजगारी वाढत आहे. तरीही या मु्द्यांवर युतीचे नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत.
महाविकास आघाडी याच मु्द्यांवर ही निवडणूक लढत आहे. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात फिरताना आम्हाला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही निवडणुकीतील देशाचे लक्ष असते. याचे कारण इथला मतदार सुजाण आहे, हुशार आहे, विचारपूर्वक मतदान करतो. लोकसभेला भाजपला, महायुतीला फटका देऊन त्यांनी ते दाखवून दिले. तीच स्थिती आजही आहे. भाजप व महायुतीचे विचार तेच आहेत, कृती तीच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता राज्यात येईल असा विश्वास पायलट यांनी व्यक्त केला.