बारामती : सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीला यश मिळाले नाही, ज्यांना यश मिळाले. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा त्यांनी केंद्रातून निधी आणावा. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे. तर आम्ही राज्याच्या माध्यमातून कोकणसाठी निधी उपलब्ध करुन देऊ, सर्वांनी मिळून कोकणचा कायापालट करु असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी रविवारी(दि २) बारामतीत म.ए.सो. विद्यालयात पवार यांनी आपला मतदानाचा हक्क आज सकाळी बजावला. याावेळी पवार यांनी अर्थमंत्री येऊनही बँकेच्या निवडणूकीत फरक पडला नाही. या नारायण राणे यांच्या वकत्व्याबाबत बोलताना हा टोला लगावला.
तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्ण
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने त्याला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण आढावा घेत होतो. तिसरी लाट येईल असे गृहीत धरुन व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व साधे असे तिन्ही बेडस वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरवठा तिप्पट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व आरोग्य विभागास दिले होते. दुस-या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजन जितका लागला त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे. आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण रुग्णालय मंजूर केली, त्या साठी जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
पन्नास टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असणाऱ्या कार्यक्रमांना मी स्वतः जाणार नाही
दुसरीकडे नगरपालिका, महानगरपालिकांच्या रुग्णालयातही व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन विकास निधीपैकी तीस टक्के निधी या कामांसाठी खर्च करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. चार कोटींच्या आमदारनिधीपैकी एक कोटी रुपये आरोग्यासाठी खर्च करण्याची परवानगी दिली होती. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी आता प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सगळ्यांनी नियमांच पालन करा. ५० टक्के पेक्षा जास्त लोक असल्यास ‘त्या’ कार्यक्रमाला जाणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपल्याशिवाय निवडणूका घेऊ नये याबाबत सर्वच राजकीय पक्षांचे एकमत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तेथील सरकारला निवडणूका पुढे ढकलण्याबाबत सुचविले आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीचे गांभीर्य सर्वांनीच लक्षात घ्यावे. प्रत्येक घटकाला त्याचा अधिकार मिळत नाही तो पर्यंत कोणतीही निवडणूक होऊ नये यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही विचार करत असल्याचे पवार म्हणाले.