पुणे : कर्वेनगरमधील एका शाळेतील नृत्य शिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली आहे. अन्वित सुधीर फाटक असे या संस्थाचालकाचे नाव आहे. कर्वेनगरमधील शाळेतील नृत्य शिक्षकाने लहान मुलांवर लैंगिक व्हिडीओ दाखवून अत्याचार केले. त्याचे अत्याचाराचे मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करुन ती इतर लोकांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच मुलाला शपथ देऊन मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबरपासून ते १४ डिसेंबरपर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नृत्य शिक्षकाला अटक केली होती. या घटनेत निष्काळजीपणा दाखवल्याने संस्थाचालक अन्वित फाटक याला देखील अटक केली आहे. दरम्यान, या शाळेमध्ये समुपदेशन दरम्यान आणखी काही लहान मुलांवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतही तपास करावा, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना भेट देऊन केली. या प्रकारात शाळा प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संस्थाचालक अन्वित फाटक व विश्वस्त देखील तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
शाळेत मुलांचे गुड टच, बॅड टच संदर्भात समुपदेशन होत नाही़ पालक व शिक्षकांच्या बैठका वेळेवर होत नाही. शिक्षकांचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासले जात नाही. संस्थेचे प्रशासन याबाबत गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे या घटना घडत असल्याचे पालकांनी पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणले.