आंबेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम आदिवासी भागातील भातशेती, भातपिके, रस्ते आणि पूल यांचे माेठे नुकसान झाले. याची पाहणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी केली. या वेळी त्यांनी उगलेवाडी गोहे, चिखली, तळेघर, कुशिरे, माळीण, बोरघर, डिंभे या गावांना भेटी देत तेथील नागरिकांची संवाद साधला. या वेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या पूर्वा वळसे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, पंचायत समिती सदस्या इंदूताई लोहकरे, प्रकाश घोलप, मारुती लोहकरे, सलिम तांबोळी, मारुती केंगले, भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे, रत्नाकर कोडीलकर, दत्ता कौदरे, प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, कार्यकारी अभियंता बी. एन. बहीर, तहसीलदार रमा जोशी उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यात माळीणसारखी पाच गावे धोकाग्रस्त आहेत. ह्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. यासाठी कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांचे विमा काढण्यासाठी गावोगावी माणसे नेमावीत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. यातून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. वाहून गेलेले रस्ते व पुलांचे काम लवकरात लवकर सुरू करा. आदिवासी भागातील आदिवासी बांधवांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता कोरोणा लसीकरण करून घ्यावे. तळेघर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम सुरु केले जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
चौकट
आदिवासी विकास महामंडळ घाट्यात असल्यामुळे हिरडा खरेदी बंद केली आहे. शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळावर अवलंबून न राहता वेगवेगळे पर्याय शोधले पाहिजे. आदिवासी लोकांनी हिरडा प्रक्रिया व हिरड्याच्या बाजार पेठेत उतरण्याची तयारी केली पाहिजे. - दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
फोटो : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात झालेल्या शेतीच्या व बांधबंदिस्तांच्या नुकसानीची पाहणी करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.