पुणे : शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे पात्र हे संरक्षित क्षेत्र असतानाही मुळा-मुठा नदीत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनकडून (महामेट्रो) राजरोजसपणे राडारोडा टाकण्यात येत असतानाही, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले होते़ मात्र मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत कानउघाडणी केल्यानंतर हा राडारोडा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, महापालिकेनेही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतच्या सूचना महामेट्रोला केल्या आहेत़
शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाच्या अनुषंगाने जमा होणारा राडारोडा हा राजरोसपणे नदीपात्रातच टाकला जात होता़ तरीही याकडे महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून सारंग यादवाडकर व अन्य काही जणांनी अॅड़रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती़ त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने नदीपात्रातील राडारोडा तत्काळ काढण्याबाबतचे आदेश दिले आहेत, तर या कामात पुणे महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने महामेट्रोला सहकार्य करावे, असेही सांगितले होते़
याबाबत महापालिकेशी संपर्क साधला असता नदीपात्रातील राडारोडा काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले असून, त्यासाठी अतिरिक्त यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले़ रविवारी सुटीच्या दिवशीही हा राडारोडा हटविण्याचे काम सुरू होते. तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी दिली आहे़ तर या कामाचा दररोज आढावा घेतला जात असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ़ कुणाल खेमनार यांनी सांगितले आहे़
----------------------------------