ऑनलाइन लोकमत
पिंपरी,दि.18 - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पदाधिकारी आणि देवस्थान प्रतिनिधी, दिंडेकरी अशी बैठक झाली. सोहळ्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात अशी सूचना पदाधिकाºयांनी प्रशासनास केली. दिंडेक-यांनी केलेल्या मागणीनुसार रिचार्जेबल बॅटरी, ताडपत्री किंवा तंबू अशा वस्तूंपैकी कोणती वस्तू द्यायची यावर निर्णय होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ऐनवेळी दिंडेकºयांना कोणती वस्तू द्यायची याबाबत चर्चा होते. ऐनवेळी निविदा प्रक्रिया केली जाते. गेल्यावर्षी मूर्ती खरेदीत भ्रष्टचार झाल्याच्या मुद्या भारतीय जनता पक्षाने उचलून धरला होता. याबाबत झालेल्या चौकशी कोणताही आर्थिक गैरव्यहार न झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला होता. मात्र, श्री. विठ्ठलमूर्ती गैरव्यवहाराचे प्रकरण गाजल्याने भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत येतानाच सण, उत्सव आणि सोहळ्यांविषयी स्थायी समितीने धोरण निश्चित केले आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करा, ऐनवेळी प्रस्ताव आणू नका? असे प्रशासनास सूचित केले होते. येत्या जून महिन्यांत पालखी सोहळा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज स्थायी समिती सभागृहात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पदाधिकारी आणि देवस्थान प्रतिनिधी, दिंडेकरी अशी बैठक झाली. यावेळी महापौर नितीन काळजे, आयुक्त दिनेश वाघमारे, आळंदी देवस्थानाचे प्रमुख डॉ. अजित कुलकर्णी, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार,अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतीक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे ,मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्षगटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख सुनिल दिगंबर मोरे, सुनिल दामोदर मोरे, जालिंदर महाराज मोरे, अभिजीत मोरे, अशोक मोरे. आळंदी देवस्थान पालखी सोहळा प्रमुख डॉ. अभय टिळक, बाळासाहेब चोपदार,
राजाभाऊ चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर, गणपत शेंडे, मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, सह शहर अभियंता अंबादास चव्हाण, परिमंडळ ३ चे पोलीस उपयुक्त गणेश शिंदे, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अन्न निरीक्षक के.बी. जाधव उपस्थित होते.
बैठकीमध्ये उपस्थितांनी निगडी येथील भक्ती शक्ती चौक व आळंदी फाटा, भोसरी येथे भव्य उंच कमानी उभारण्यात याव्यात, आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना असावी. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन बारी साठीची योग्य ती व्यवस्था करावी. पालखी मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व कचराकुंड्या स्वच्छ ठेवाव्यात अशाही सूचना यावेळी प्राप्त झाल्या. पालखी मार्गावरील रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी दिल्या. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे मत पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.
पालखी सोहळ्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींची समिती करावी असे नगरसेवक तुषार हिंगे यांनी या बैठकीत सांगितले. तर समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. पालखी सोहळ्या समवेत पाण्याचे टँकर, व वैद्यकीय सेवा सुविधा सह अॅम्बुलन्स ची व्यवस्था करून देण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पुरेशी सुरक्षा व्यवस्था, फिरते शौचालय यांची व्यवस्था करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी या बैठकीत केल्या. पालखी सोहळा कालावधीत शहरात स्वच्छता ठेवण्यात यावी तसेच पालखी मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते स्वच्छ ठेवण्याची चोख व्यवस्था करावी अशीही सूचना या बैठकीत करण्यात आली.