पुणे - अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार उभे असलेल्या मावळ मतदारसंघात आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार एका मतदाराने दिली आहे. विशेष म्हणजे बळजबरीने शिवसेनेला मतदान करायला सांगितल्याचा आरोप या मतदाराने केला आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या काँटे की टक्कर होत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवडच्या किन्सटाऊन मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. येथील रहिवासी असलेल्या हुमरा पठाण या जयवंत भोईर प्राथमिक शाळेत मतदानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी, बुथवरील मतदान अधिकारी निकाळजे यांनी शिवसेनेला मतदान करण्याची सूचना हुमरा यांनी केली. शाळेच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 2 मधील बुथ क्रमांक 33 येथे त्यांचे मतदान होते. आपले ओळखपत्र आणि मतदानाची पावती घेऊन मतदान केंद्रावर हुमरा पठाण पोहोचल्या. त्यावेळी, तेथील कर्मचारी निकाळजे यांनी धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन त्यांना केले. विशेष म्हणजे निकाळजे यांच्याकडून सर्वच मतदारांना तसे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत हुमरा पठाण यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी स्वरुपात तक्रार केली आहे.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत असून महाराष्ट्रातील मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे. शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, वंचित बहुजन विकास आघाडीसह अपक्षांनी पदयात्रा, कोपरा सभा, मतदार संवाद करून प्रचाराची सांगता केली. प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि पवारपुत्र पार्थ पवार यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.