पुणे : शिवसेनेतील बंडाळीचा पुणे शहर व जिल्ह्यातही काही विशेष परिणाम झालेला नाही. माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यासारखे काही माजी लोकप्रतिनिधी वगळता बहुतांश शिवसैनिक तसेच संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांनाच पसंत केले असल्याचे दिसते आहे.
पुणे शहर व तालुक्यातील संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यात किंवा शहरातही कोणी प्रभावी समर्थक नाही किंवा त्यांचा इथे संपर्कच नाही. त्यामुळेच त्यांना बंडखोरी केल्यानंतर इतरत्र जसा त्याला प्रतिसाद मिळाला तसा पुण्यात काहीच मिळाला नाही. उलट बंडखोरांवर संघटनेचे पदाधिकारी तसेच सामान्य शिवसैनिकही टीकाच करत आहेत.
काही माजी लोकप्रतिनिधींचा याला अपवाद आहे, मात्र त्यांनीही बंडखोरांची साथ न देता उद्धव ठाकरेंचे काय चुकले यावरच भर दिला आहे. त्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा प्रामुख्याने समावेश आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार बनवणेच मुळात चुकीचे होते अशी जाहीर प्रतिक्रिया यांनी शिंदे यांच्या बंडानंतर दिली. युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांनीही उद्धव ठाकरे यांचे चुकलेच अशा आशयाचे मत जाहीरपणे व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शिवसेनेच्या शाखा आहेत. पुणे शहरातही शिवसेना आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत काही ठिकाणी नगरसेवकही आहेत. मात्र आमदार किंवा खासदार नसल्याने त्यांची शक्ती क्षीण आहे. तरीही आहेत ते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव ठाकरेंबरोबरच आहेत. बंडखोरांना कोणत्याही तालुक्यातून पाठिंबा मिळालेला नाही. उलट पुण्यातील शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी शिंदे यांचे पुण्यातील कार्यालय फोडले.
जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार सध्या नाही. सन १९९५ मध्ये पुणे शहरातील ३ जागा तसेच जिल्ह्यातील २ जागा अशा एकूण ५ जागा शिवसेनेच्या ताब्यात होत्या. ती जिल्ह्यातील शिवसेनेची सर्वोत्तम स्थिती होती. त्यानंतर मात्र या जागा कमीकमीच होत गेल्या. आता तर जिल्ह्यातील २१ जागांमध्ये शिवसेनेची एकही जागा नाही.
शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशीच निष्ठावंत
''जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशीच निष्ठावंत आहे. त्यामुळे बंडखोरांना इथे थारा नाही. एकाही तालुक्यातून त्यांना साथ मिळालेली नाही. उलट अनेक तालुकाप्रमुखांनी फोन करून मला आम्ही उद्धव ठाकरेंबरोबरच आहे असे सांगितले असे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले.''
बंडखोरांचा निषेध करणारी सर्वाधिक आंदोलनही पुण्यातच
''भूम परांडा येथून निवडून आलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यात कार्यालय आहे. त्यावर हल्ला करून शिवसैनिकांनी ते कोणाबरोबर आहेत ते दाखवून दिले आहे. बंडखोरांचा निषेध करणारी सर्वाधिक आंदोलनही पुण्यातच झाली असल्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले आहेत.''