पुणे : कोरोना चाचणी करण्यास गेलेल्या नागरिकांची संपूर्ण माहिती घेतली जात नसल्याने तसेच ही माहिती पालिकेला वेळेत दिली जात नसल्याने रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे काही रुग्णांचा थांगपत्ताच लागत नसल्याने अडचणी वाढतात. त्यामुळे 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'च्या कामात सुसूत्रता आणण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी लॅब आणि खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक घेण्यात येणार आहे.
कोरोना संक्रमित रुग्णांचे तपासणी नमुने घेताना रुग्ण राहत असलेला सध्याचा पत्ता जवळच्या खुणेसहीत घेण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच रुग्णाचा चालू असलेला मोबाईल क्रमांक आणि जवळच्या नातेवाईकाचे नाव घेण्यातही हलगर्जीपणा केला जातो.
कोरोना संक्रमित रुग्णांचे चुकीचे पत्ते व चुकीचे मोबाईल नंबर घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. संक्रमित रुग्णांचे एक महिन्यापूर्वी आलेले नाव पुन्हा चालू तारखेच्या यादीमध्ये येण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांची नावे पॉझिटिव्ह यादीमध्ये येत आहेत.
तसेच शहराबाहेरील पत्ता असलेल्या रुग्णांची नावे पुणे महानगरपालिकेच्या यादीमध्ये देणे, एकाच दिवसाच्या यादीमध्ये दुबार नावे येणे व वारंवार येणे, रिपोर्ट (दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची नावे) उशिरा दिली जाणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्याकरिता या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी एसओपी तयार केली जाणार आहे.
-----
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. १ मार्चपासून आम्ही या कामात मोठ्या प्रमाणावर बदल घडविले आहेत. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आणखी बदल होणे आवश्यक असून कामाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता येत्या १ जून रोजी बैठकीचे करण्यात आले आहे.
- डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका