पुणे : स्थळ : बॉम्बे कॉलनी, दापोडी... वेळ : दुपारी साडेबाराच्या सुमारास... एक ठेकेदार अचानक येतो आणि लोकांनी अपघात रोखण्यासाठी बनविलेला स्पीडब्रेकर उखडण्याची ‘आॅर्डर’ देतो. मजूर दहा मिनिटांत स्पीडब्रेकर उखडतात. ‘अहो, तो काढू नका!’ असे नागरिक ओरडतात. पण, ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करतो. ‘साहेबांनी सांगितले म्हणून काढून टाकतोय...’ हे ठेकेदाराकडून सांगण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट येते. काही मिनिटांतच परिसरात राहणारे नागरिक रस्त्यावर जमा होतात आणि या संतापाचा उद्रेक होतो. ते लगेचच संबंधित साहेबाच्या कार्यालयाच्या दिशेने निघतात आणि ‘आम्हाला स्पीडब्रेकर हवा’ या मागणीसाठी एकजूट दाखवितात.दापोडीतील नेहमी दुर्लक्षित असलेल्या बॉम्बे कॉलनीमध्ये ही घटना दुपारी घडली. पूूर्वी या भागात रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना अटकाव नव्हता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत भरधाव वाहनांनी चार अपघातांच्या घटना घडल्या. यामध्ये एका ४ वर्षाच्या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर एका तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडे अनेकदा स्थानिक नागरिकांनी मागणी करूनही या घटनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. या घटनांमुळे वैतागलेल्या स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत शुक्रवारी रात्री स्वत:चे पैसे खर्च करून एक स्पीडब्रेकर उभारला. या स्पीडब्रेकरमुळे तरी अपघात कमी होतील, अशी आशा या सामान्य नागरिकांना होती. मात्र, महापालिकेचे स्थानिक नगरसेवक व प्रशासनाच्या परवानगीशिवाय स्पीडब्रेकर बसविल्याने अनेकांचा अहंकार दुखावला गेला. त्यामुळे थेट ठेकेदाराला स्पीडब्रेकर काढून टाकण्याचे फर्मान मंगळवारी देण्यात आले. हा आदेश ‘शिरसावंद्य’ मानत ठेकेदाराने लगेचच आपल्या मजुरांना स्पीडब्रेकर काढण्यास सांगितले. मजुरांनी लगेचच कुदळ-फावड्यांनी स्पीडब्रेकर उखडला. हे पाहताच या भागातील नागरिक रस्त्यावर आले. तो काढू नका, अशी ते विनंती करत होते. नागरिकांनी येथील परिस्थिती आणि ब्रे्रकरची आवश्यकता ठेकेदाराला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकसाहेब यांनी सांगितल्याने ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष करीत स्पीडब्रेकर उखडून टाकला.या भागातील ५० ते ६० नागरिक जमले. नागरिकांनी स्पीडबे्रकर काढण्याचा आदेश दिलेल्या संबंधित नगरसेवकांच्या कार्यालयाच्या दिशेने मोर्चा वळविला. नागरिकांच्या असंतोषाला नगरसेवकाला सामोरे जावे लागले. (प्रतिनिधी)
दापोडीत एका स्पीडब्रेकरसाठी एकवटली जनशक्ती
By admin | Published: March 02, 2016 12:58 AM