पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधरच्या पहिल्या फेरीत एकता पॅनलचे दोन, तर प्रगती पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला. या फेरीत एकता पॅनलचे ५ उमेदवार आघाडीवर आहेत.एकता पॅनलचे संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर व विद्यापीठ प्रगती पॅनलचे अनिल विखे विजयी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधरच्या १० जागांसाठी ४३ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. पहिल्या फेरीत संतोष ढोरे ४ हजार, तर अनिल विखे ३ हजार ७३२ मते मिळवून विजयी झाले. प्रसेनजीत फडणवीस पहिल्या फेरीत चौथ्या क्रमांकावर राहिले, त्यांना २ हजार ८६५ मते मिळाली. तानाजी वाघ यांना ३ हजार १८८, अभिषेक बोके यांना १ हजार ९४१ मते पडली. ओबीसी प्रवर्गातून दादाभाऊ शिनलकर ११ हजार ३०६ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी युवराज नरवडे यांना ९ हजार ६७५ मते पडली. मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. नोंदणीकृत पदवीधरचे ४९ हजार ७६१ मतदार आहेत, त्यापैकी २३ हजार ७२६ मतदारांनी (४७.६६) मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी २० हजार ८५६ मते वैध ठरली. त्यानुसार विजयासाठी ३ हजार ४७७ मतांचा कोटा आवश्यक होता.अधिसभेच्या २३ हजार मतपत्रिकांची छाननी करण्याची प्रक्रिया दुपारी अडीच वाजेपर्यंत चालली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरच्या १० जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते. खुल्या गटातील ५ जागांसाठी १९ उमेदवार, महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी ३ उमेदवार, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी ६ उमेदवार, अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, डीटी/एनटी प्रवर्गाच्या एका जागेसाठी ५ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.पदवीधर महिला राखीव गटात एकता पॅनलच्या बागेश्री मंठाळकर विजयी झाल्या. त्यांनी मनीषा कमानकर यांचा पराभव केला. मंठाळकर यांना १०,९४४, तर कमानकर यांना ८६८२ मते मिळाली. पदवीधर अनुसूचित जमाती प्रवर्गातून एकता पॅनलचे विश्वनाथ पडवी १२ हजार १४० मते मिळवून विजयी झाले.
‘पदवीधर’मध्ये एकता पॅनलची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:53 AM