लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राहुल गांधी यांच्यावर खालच्या दर्जाची टीका करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कसलेही भान राहिलेले दिसत नाही, आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांकडून तशी अपेक्षा ठेवण्यातही काही अर्थ नाही, अशी टीका करत काँग्रेसने पाटील यांच्यावर पलटवार केला.
केंद्र, राज्य आणि खासगी रूग्णालये यांच्यासाठी कोरोना लसीचे स्वस्त, कमी महाग आणि महाग असे वेगवेगळे दर ठेवणाऱ्या अदर पुनावाला यांना राहुल गांधी यांनी मोदीमित्र म्हटले होते. त्यावर पाटील यांनी राहुल यांच्यावर टीका केली. त्याचा समाचार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतला.
बागवे म्हणाले, सध्या पाटील अशी काही बेताल बडबड करत आहेत की डोके कोणाचे फिरले आहे आणि बुद्धी कोणाची भ्रष्ट झाली आहे हे सगळ्या राज्याला समजले आहे. ज्या राहुल यांच्यावर पाटील टीका करतात, त्यांनीच सर्वप्रथम पश्चिम बंगालमधील स्वतःच्या सर्व प्रचारसभा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द केल्या. त्या वेळी मोदी आणि अमित शहा यांना भान आले व त्यांनी आपला तिथला मुक्काम उठवला. यावरून कोण शहाणे आहे ते पाटील यांनी समजून घ्यावे.
स्वतःचा मतदारसंघ नाही, आयतोबा होऊन पुण्यातून निवडून आले, पण पुण्याशी कोणतेही भावनिक नाते जोडू शकले नाहीत,पक्षातही काही किंमत राहिली नाही, त्यामुळे राहुल गांधींवर घाणेरडी टीका करून बातम्या छापून आणायच्या व त्या वरिष्ठांना दाखवून पक्षातील वरिष्ठांशी मर्जी राखून स्वत:चे पद टिकवायचे, एवढीच पाटील यांची कुवत असल्याचे त्यांच्या बेताल वक्तव्यावरून सिद्ध होते आहे, असे बागवे म्हणाले.