पुणे :महात्मा गांधी आणि त्यांच्या समकालीन महामुरुषांमध्ये वैचारिक मतभिन्नता असली, तरी त्या्च्यात प्रेमाचा ओलावा हाेता, आदरभाव हाेता. परंतु आज वैचारिक मतभिन्नतेऐवजी व्यक्तीद्वेषच अधिक दिसून येताे.पुतळे उभारून एकमेकांवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे. पण पुतळ्यांच्या उंचीपेक्षाही वैचारिक उंची अधिक महत्वाची असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि गांधी व्हिजन फिचर्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ’गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उल्हास पवार बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
उल्हास पवार म्हणाले, गांधींच्या आयुष्यात अहंकाराला महत्त्व नव्हते. त्यांच्या विचारांनी, दर्शनाने अनेकांना प्रेरणा मिळत असे. त्यांच्या नजरेत एक सामर्थ्य होते, ते समोरच्याला प्रभावित करीत असे. त्यांनी नेहमी सत्य आणि अहिंसा याचा पुरस्कार केला. आज जिथे सत्य आणि अहिंसा आहे, तिथे गांधींची भेट झाल्याशिवाय राहत नाही. गांधींनी नेहमी हिंदू असल्याचा अभिमान बाळगला. मात्र इतर धर्माचा आणि भावनेचा आदर त्यांनी केला. शोषित, वंचित, दबलेल्या भारतीय घटकांचे गांधींनी प्रतिनिधित्व केले. अनेक विदेशी लोक गांधींना प्रेरणास्रोत मानतात. १२० पेक्षाही जास्त देशात गांधी विविध स्वरूपात भेटतात. सहनशील, विनयशील गांधी पुन्हा पुन्हा भेटत राहावेत. त्यांच्या विचारांचे आचरण हीच त्यांना आदरांजली ठरेल.