कोरेगाव भीमा : शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांना आलेल्या धमकीचा राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सणसवाडी येथे काळ्याफिती लावून प्रातिनिधीक रास्ता रोकोसह जोरदार घोषणाबाजी करुन निषेध केला. तसेच धमकी देणाऱ्यांस तातडीने जेरबंद करण्याची मागणीही केली.
शिरुर येथे एका निनावी पत्राद्वारे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीबराेबरच त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांबद्दलही निनावी पत्राद्वारे असभ्य भाषेत बदनामीचा प्रकार शिरुर येथे उघडकीस आल्यानंतर विविध ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. सणसवाडी येथेही मुख्य चौकात झालेल्या निषेध सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निनावी धमकीपत्राचा तीव्र शब्दात निषेध करीत आरोपीच्या अटकेसाठी जोरदार घोषणाबाजीसह प्रातिनिधीक रास्ता रोकोही केला.
तर शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत शेडगे यांना निवेदनही देण्यात आले. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडितआप्पा दरेकर, शिवसेना जिल्हा सल्लागार अनिल काशीद, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश ढमढेरे, तालुकाध्यक्ष वैभव यादव, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, यांच्यासह तिन्ही पक्षांच्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी धमकी बद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी करीत आमदार पवार यांना पाठींबाही व्यक्त केला.