पुणे : शाळेचा पहिला दिवस म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या मनात समिश्र भावना असतात. नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन मित्र भेटणार यामुळे काहीजण खुश असतात, तर सुट्यांनंतर पुन्हा शाळा नकाे अशी काहींची भावना असते. शाळेचा पहिला दिवस प्रत्येकासाठी खास असताे. पुण्यातील रमणबाग शाळेने विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवसानिमित्त अनाेखा उपक्रम राबविला हाेता. शाळेतर्फे पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना तुळशीची राेपे वाटण्यात आली. तसेच ही राेपे आपल्या घरी नेऊन वाढविण्याचा सल्ला देण्यात आला. या अनाेख्या भेटीमुळे विद्यार्थीसुद्दा खुश हाेते.
आज राज्यभरातील सर्व शाळा सुरु झाल्या. सकाळी विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली. पुण्यातल्या अनेक शाळांबाहेर गर्दी झाली हाेती. पाल्याचा शाळेतला पहिला दिवस असल्याने अनेक पालक आवर्जुन पाल्याला शाळेत साेडायला आले हाेते. शाळांनी देखील मुलांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयाेजन केले हाेते. काही शाळांमध्ये मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले तर काही शाळांमध्ये ढाेल ताशांच्या गजरात मुलांचे स्वागत करण्यात आले. रमणबाग शाळेने यंदा अनाेखा उपक्रम राबविला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी तुळशी राेपे वाटण्यात आली. तसेच या राेपांचे, पर्यावरणाचे महत्त्व देखील समजावून सांगण्यात आले. 350 हून अधिक विद्यार्थ्यांना या राेपांचे वाटप करण्यात आले.
याबाबत बाेलताना शाळेच्या मुख्याध्यापिका तिल्लाेत्तमा रेड्डी म्हणाल्या, प्रत्येक वर्षी शाळा विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाटी पेन्सिल देऊन स्वागत करत असते. यंदा आम्ही तुळशीची राेपं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काळात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना कडुलिंबाची राेपं देण्याचा आमचा मानस असून विद्यार्थ्यांनी ते राेप सहा सात महिने वाढवून शाळेत दाखवायचे. त्यानंतर जिथे शक्य आहे तिथे ते लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येकाने एकतरी राेप लावलं पाहिजे. जेवढी लाेकसंख्या आहे तितकी झाडं लावणं आवश्यक आहे. तरच आपल्याला पर्यावरणाचा समताेल राखता येणार आहे. तुळशीच्या अनेक उपयाेगांची मुलांना माहिती व्हावी म्हणून तुळशीची राेपं वाटण्यात आली.