पुणे : लग्न म्हटलं की माेठ्याप्रमाणावर खर्च हाेत असताे. त्यातच लग्नपत्रिका आकर्षक असावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्सला नागरिकांची पसंती असते. असे असले तरी लग्न झाल्यानंतर पत्रिका या रद्दीमध्येच टाकून दिल्या जातात. त्यांचा फारसा वापर हाेत नाही. हेच लक्षात घेऊन पुण्यातील एका नवऱ्या मुलाने अनाेखी शक्कल लढवली आहे. त्याने थेट कापडी पिशवीलाच पत्रिकेचं आवरण करुन लग्नपत्रिकेचं खत निर्माण हाेईल अशी पत्रिका तयार केली आहे. त्यामुळे कापडी पिशवीचा लाेकांना वापर करता येणार असून लग्नपत्रिका सुद्धा खत निर्माण करण्याकरीता वापरता येणार आहे.
प्रणव गडगे यांचे 20 एप्रिलला लग्न आहे. प्रणव हे संजिवनी कंपाेस्टिंग बॅग तयार करणाऱ्या संस्थेमध्ये काम करतात. संजिवनी कंपाेस्टिंग बॅग ही राजेंद्र लडकत यांची संकल्पना आहे. या बॅगचे त्यांच्याकडे पेटंट'देखील आहे. प्रणव यांच्या लग्नात बॅग तयार करावी ज्याचा उपयाेग लाेकांना हाेईल असे दाेघांनी ठरवले. त्यानंतर डब्याला वापरण्यात येते तशी बॅग तयार करण्यात आली. त्यावर जय जवान जय किसान याबराेबरच स्वच्छ भारत अभियान असा संदेश लिहीण्यात आला. या बॅगेत अगदी साधी जिचं खत निर्माण हाेऊ शकेल अशी पत्रिका देण्यात आली आहे. सध्या राज्यात प्लॅस्टिक बंदी असल्याने लाेकांना या बॅगचा वापर दैनंदिन कामासाठी करता येणार आहे.
लाेकमतशी बाेलताना गडगे म्हणाले, अनेकदा लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्रिका या लग्न झाल्यानंतर फेकून देण्यात येतात. या पत्रिकांवर माेठा खर्च हाेत असताे. मी स्वतः वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करत असल्याने माझ्या लग्नात वेगळ्या पद्धतीची पत्रिका तयार करण्याचा विचार करत हाेताे. संजिवनी कंपाेस्ट बॅग चे मार्केटिंग चे काम मी करताे. सध्या राज्यात प्लॅस्टिक बंदी असल्याने नातेवाईकांना उपयाेगी हाेईल अशा कापडी मजबूत बॅगेत आपण पत्रिका देऊयात असे आम्ही ठरवले. त्या पद्धतीने या बॅगेची पत्रिका तयार केली. त्याचबराेबर यावर जय जवान जय किसान या संदेशाबराेबरच स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देखील दिला. या बॅगेत असलेली पत्रिका अगदी साधी ठेवली आहे. ती फेकून दिली तरी तिचं खत हाेऊ शकेल अशी ही पत्रिका आहे. माझे सासरे देखील वेस्ट मॅनेटमेंट मध्ये काम करत असल्याने त्यांनी देखील आगळी वेगळी पत्रिका तयार केली आहे. त्यांनी एका पुठ्यापेक्षा कणक प्राेडक्ट वापरुन एक फ्रेम तयार केली आहे. आणि त्याच्या आत पत्रिका ठेवण्यात आली आहे. लग्नानंतर पत्रिका जरी फेकून दिली तरी लाेकांना ती फ्रेम फाेटाेफ्रेम म्हणून वापरता येणार आहे.