पुणे : एल्गार परिषदेच्या अनुषंगाने आरोपींकडून जप्त करण्यात आलेला इलेक्ट्रॉनिक डाटा नेमका किती, कशा प्रकारचा व शेवटी कधी वापरण्यात आला याबाबत अधिकृत रीडिंग असलेली कोणत्या एकाही छाप्याची हॅश व्हॅल्यू (सिक्युरिटी की) काढली नाही. कारण त्यांना संबंधित डेटामध्ये हस्तक्षेप करून काही गोष्टी त्यात अंतर्भूत करावयाच्या होत्या, असा आरोप संशयित आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी सोमवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात केला.
कोरेगाव-भीमा शौर्य प्रेरणा अभियानचे फेसबुक पेजवरील हॅश व्हॅल्यू पोलिसांनी काढली. कारण त्यावर आक्षेप घेता येऊ शकला असता. पण जप्त केलेल्या सीडी, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क यांची हॅश व्हॅल्यू काढण्यात आली नाही. त्यामुळे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केलेला तपास संशयास्पद असून, त्याला कोणताही आधार नसल्याचा दावा त्यांनी केला. एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास करताना सीपीआय माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचे कारणावरून देशभरात विविध १४ जणांच्या घरी छापे टाकून सायबर तज्ज्ञाच्या उपस्थितीत मुद्देमाल जप्त केला होता.
गडलिंग स्वत:चा जामीन अर्जावर युक्तिवाद करताना म्हणाले, वेगवेगळ्या छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या डेटाच्या क्लोन कॉपी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्याचे पोलीस सांगतात, तर कधी अद्याप काही कागदपत्रे मिळवयाची असल्याचे स्पष्ट करतात. मी नक्षलवाद्यांच्या विरोधातील केसेस चालवतो. त्यामुळे मला पोलिसांनी सदर गुन्ह्यात अडकवले असून, अनेक वेळा धमकावले आहे. गडचिरोली येथील साईबाबाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मला केस चालवू नको म्हणून धमकावले होते व आजही तेच सुरू आहे. आज (मंगळवार) जामिनावर अंतिम युुक्तिवाद होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.सीआरपीसी कायद्यानुसार पोलिसांना आरोपी अटक करण्याचे व छापे टाकण्याचे अधिकार आहेत. मात्र, यूएपीए कलमानुसार कारवाई करताना ठराविक अधिकाऱ्यांनाच अटक व छाप्याचे अधिकार देण्यात आले आहेत. माझ्या घरी छापे टाकणारे एसीपी व तपास अधिकारी यांना याबाबत कोणताही अधिकार नव्हता. पानसरे, दाभोलकर खून प्रकरणातील मारेकरी पुणे पोलिसांना मिळून येत नाही; मात्र ढवळे, गडलिंग, विल्सन यांचे घरी छापे मारून कारवाई दाखवता येते.४कर्नाटक पोलिसांच्या पुढाकारामुळे दाभोलकर, पानसरे केसचे धागेदोरे मिळून आले. मात्र, त्यातील प्रमुख आरोपींना शोधण्याचे काम पुणे पोलीस करीत नसून त्यांनी संबंधित खुनातील आरोपींना शोधावे.