पुणे : राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. मात्र या संपामुळे रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुण्यातील बी जे मेडिकल मध्ये संपाला पाठिंबा म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये इंटर्न डॉक्टर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशी माहिती बी जे मेडिकलचे डॉ केतन देशमुख यांनी दिली आहे. राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून काम थांबवले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप करण्यावर ते ठाम आहेत.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार ९०० , कर्नाटकमध्ये १९ हजार ९७५, पश्चिम बंगालमध्ये २१हजार, बिहारमध्ये १५ हजार, छत्तीसगढ, ओरिसा, आसाम आणि केरळमध्ये दरमहा २० हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जाते. या संदर्भात नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. एप्रिल 2018 रोजी याच विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी निदर्शने सुद्धा केलीत . 2 मे २०१८ ला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स च्या प्रतिनिधींना येत्या 15 दिवसात या विषयावर निकाल लावण्याचे आश्वासन देण्यात आले .तरी मागील ३०-४०दिवसांपासून यावर निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने संपूर्णं महाराष्ट्रतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना संपावर जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.