Vadgaon Sheri Assembly Constituency : विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना पुण्यात सत्ताधारीमहायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सोशल मिडिया पोस्टमधून आपली नाराजी व्यक्त केलीय. विकास कामाच्या जाहिरातीवर शिवसेना आणि भाजप नेत्यांचे फोटो नसल्याने भाजपचे जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटातील आमदार सुनील टिंगरे यांच्यातील अंतर्गत वाद समोर आला आहे.
विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातील ३०० कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याची जोरदार जाहिरात सुनील टिंगरे यांनी केली आहे. मात्र या जाहिरातीवरुन भाजप आक्रमक झाला आहे. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांनी केलेल्या जाहिरातबाजीवरुन आक्षेप घेतला आहे. महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? असा सवाल जगदीश मुळीक यांनी केला आहे.
"वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे!वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत! तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही," असं जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत टिंगरे यांनी भाजपचे तत्कालीन आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुनील टिंगरे हे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे भाजपबरोबर युती करून तेही सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे वडगाव शेरीच्या जागेवरुन महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे, वडगावशेरीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली. या दरम्यान अजित पवारांनी सुनील टिंगरे यांचे कौतुक केलं होतं.