पुणे - लोकसभा निवडणुकीची तयारी मी आधीपासून करतोय. पक्षाच्या सर्व नेत्यांना मी हे सांगितलं, माझी तयारी आहे. संघटनेच्या लोकांना स्वत:च्या पक्षातील प्रबळ दावेदार दिसत नसतील तर मी का व्यक्त व्हायचं नाही. सोशल मीडियात सुरूवात कुणी केली? अजून किती अग्निपरीक्षा द्यायच्या?. वसंत मोरे एकनिष्ठ होता आणि आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे अशी भावना मनसेचे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
वसंत मोरे म्हणाले की, सोशल मीडियात एक मुलाखत झाली. ती मुलाखत पाहून माझी सटकली. मला डिवचलं जातंय हे प्रत्येकजण पाहतोय. पक्षात लोक नाहीत का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पुण्यात वसंत मोरे आहे ना..साईनाथ बाबर, किशोर शिंदे, बाबू वागस्कर इच्छुक असताना आयात उमेदवाराचे कारण काय? कशाला आयात करायचे. मग आम्ही कायम सतरंज्याच उचलायच्या का? राजसाहेब बोलतील ना..राजसाहेबांचे आदेश आले ना आम्ही तेच करणार असं त्यांनी सांगितले.
तसेच २०१४ ला राजसाहेबांनी सांगितले, तू लढू नको. मी लढलो नाही. खडकवासल्याची तयारी केली होती पण माघार घेतली. २०१९ ला लढ म्हटलं, भाजपा, राष्ट्रवादीविरोधात लढलो. आम्ही कायम छातीचा कोट करून उभेच आहोत. साहेबांनी सांगावे, तू नको लढू, बस्स, पण बाकींच्यांनी सांगू नये. मला नाव घ्यायची नाही. माझी ताकद महाराष्ट्र सैनिक आहे. वसंत मोरेला कोण डिवचतंय? निवडणुकीसाठी आम्ही १-२ वर्ष तयारी करायची आणि अशी भाषा का करायची. पक्षातील उमेदवार नाहीत का. ही भाषा करण्याचा अधिकार फक्त राजसाहेबांनाच आहे असं वसंत मोरे यांनी म्हटलं.
दरम्यान, बाहेरचा उमेदवार आयात करण्याची गरज काय, आपल्या पक्षातील इच्छुकांनाच तिकीट द्या, वसंत मोरे हा खूप छोटा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत मला जे योगदान द्यायचे ते पक्षाला दिले आहे. मी पक्ष आणि राजसाहेब यांना कधीच इशारा देऊ शकत नाही. मला पक्षाने ताकद दिली. मी सातत्याने काम करत राहिलो. महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट राबवण्याचं काम मी प्रभागात करतोय. मी कधीही हुरवळून गेलो नाही. मी कधीही पक्ष, राजसाहेब, अमित ठाकरे, वहिनी यांच्याविरोधात बोलू शकत नाही. ज्या लोकांनी आयात करण्याची भाषा केली मी त्यांना बोललो असंही वसंत मोरे यांनी स्पष्ट सांगितले.