- अतुल चिंचली - पुणे : नवीन सायकलवर स्वत:चे नाव टाकण्यात एक वेगळाच आनंद असतो. गेली ५४ वर्षे मी सायकलवर नाव टाकण्याचा व्यवसाय करीत आहे. आतापर्यंत लाखो सायकलींवर नाव टाकण्याचे काम केले आहे, असे मत हणुमंत पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. पूर्वी नवीन सायकलवर नाव टाकून घेण्याची मजाच वेगळी होती. हे काम नसून एक कला आहे. ती अधिक काळ टिकून राहायला पाहिजे. पूर्वी सायकल चोरीला जाऊ नये, म्हणून सायकलवर नाव टाकले जात होते. सायकलच्या दुकानाबाहेर नाव टाकणारी लोक बसत होती. नागरिक दुकानातून नवीन सायकल विकत घेतली, की लगेच त्या सायकलवर स्वत:चे नाव आणि सायकल विकत घेतल्याची तारीख टाकत असे. सायकल घेतल्यावर नाव टाकण्याची उत्सुकता लोकांमध्ये होती. सायकलवर नाव टाकण्याचा व्यवसाय हणमंत पवार करीत आहेत. हणुमंत पवार पुण्यात लोहियानागर येथे वास्तव्यास आहेत. पत्नी, दोन मुले आणि मुली असे त्यांचे कुटुंब होते. आता मुलांचे विवाह झाले आहेत. पवार यांनी १९६५ मध्ये या व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हापासून ते आता ५४ वर्षे झाली. ते अजूनही या व्यवसायात कार्यरत आहेत. गणेश रस्ता, फडके हौद या ठिकाणी असणाºया सायकलच्या दुकानाबाहेर असतात. पूर्वी अॅटलस, हिरो, हर्क्युलस, रॅली, रॉबिनहूड या कंपन्यांच्या सायकली प्रसिद्ध होत्या. या सायकलचे हँडल सिल्व्हर असल्याने त्यावर नाव टाकणे सोपे जात होते. ते उठूनही दिसत असे. सायकलच्या हँडलवर नाव आणि विकत घेतल्याची तारीख टाकली जात होती. १९६५ मध्ये एक नाव टाकण्याचे पन्नास पैसे घेतले जात होते. सद्य:स्थितीला एक नाव टाकण्याचे तीस रुपये घेतले जातात. नाव टाकण्यासाठी स्पंच आणि पट्टी यांचा वापर केला जातो. स्पंच पेन्सिलप्रमाणे हँडलवर उभा धरला जातो. पट्टीच्या स्पंचवर ठोकून हँडलवर नाव कोरले जाते. सायकलवरून लोक दुचाकी व चारचाकी घेण्यास आपली पसंती देऊ लागले. १९६५ नंतर १९९० पर्यंत एका दिवसात १० ते १२ सायकलींवर नाव टाकण्याचे काम करीत होतो. २००० नंतर गाड्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे आता एका दिवसात सहा ते सात सायकलींवर नाव टाकण्याचे काम करीत आहे. ..........* या कामाच्या जोरावरच केली मुलांची लग्ने१- सायकलवर नाव टाकणे हे काम नसून एक कला आहे. याबद्दल पवार यांनी एक आठवण सांगितली, १९९५ मध्ये एका व्यक्तीने ही कला पाहून मला तीनशे रुपये बक्षीस दिले.२ -माझ्या कुटुंबात दोन मुली, दोन मुलगे आणि पत्नी असे सदस्य होते. मी या व्यवसायावर माझ्या चारही मुलांची विवाह लावून दिले. सुरुवातीला मला या व्यवसायातून एका दिवसाला दहा ते बारा रुपये मिळत असत. तेव्हा मी एक रुपया बचत करीत होतो. कालांतराने जास्त पैसे बचत करू लागलो, याचा मला मुलांच्या लग्नासाठी फायदा झाला. ३ - सद्य:स्थितीत सायकलवर नाव टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आताची हँडल काळ््या रंगाची आहेत. काळ्या हँडलवर नाव टाकले की दिसत नाही. असे नवीन पिढीचे विचार आहेत. परंतु त्यांचे आई-वडील सोबत असले की नाव टाकण्याचा आग्रह करतात.
आंतरराष्ट्रीय सायकल दिन : लाखो सायकलवर नाव टाकणारा '' अवलिया ''
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 1:40 PM
गेली ५४ वर्षे ते सायकलवर नाव टाकण्याचा व्यवसाय करत आहे.
ठळक मुद्देव्यवसायात १९६५ पासून कार्यरत १९६५ मध्ये एक नाव टाकण्याचे पन्नास पैसे घेतले जात सद्य:स्थितीला तीस रुपये १९६५ नंतर १९९० पर्यंत एका दिवसात १० ते १२ सायकलींवर नाव टाकण्याचे काम होतो करत..