पुणे : डिसेंबर-जानेवारी महिना हा विविध महोत्सवांचा काळ असतो. यंदा महोत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने चित्रपट महोत्सव ‘ऑनलाइन’ की ‘ऑफलाइन’ होणार, याविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र विविध कारणांमुळे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्थांनी महोत्सवासाठी ‘ऑफलाइन’लाच झुकते माप दिले आहे.
देशविदेशातील चित्रपट प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले कान्स, व्हेनिस सारखे जागतिक महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. ‘इफ्फी’ हा प्रत्यक्ष आणि दोन्ही स्वरूपात पार पडणार असला तरी निर्मात्यांनी ऑनलाइनसाठी चित्रपटांच्या पायरसीचा मुद्दा उपस्थित केला आहे. ओटीटी प्लँटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीजचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची ‘ऑनलाइन’ चित्रपट महोत्सव अनुभवण्याची मानसिकता नसल्याचेही सांगितले जात आहे.
जानेवारीत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ), किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मेजवानी रसिकांना मिळते. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांशी ’लोकमत’ने संवाद साधला.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख वीरेंद्र चित्राव म्हणाले की, कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील निर्माते चित्रपट का पाठवतात तर त्यांच्या चित्रपटांवर चर्चा व्हावी. ऑनलाइन चित्रपट महोत्सवातून हा हेतूच साध्य होत नाही. यातच एखादा चित्रपट ऑनलाइन दाखविला तर तो कसाही ‘पायरेटेड’ होऊ शकतो. याशिवाय ऑनलाइन महोत्सवाला प्रायोजक मिळण्याच्या शक्यता खूप कमी असते.
महोत्सवात किती नवीन चित्रपट प्रदर्शित होतात हे देखील महोत्सवाचे आकर्षण असते. यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यामुळे चित्रपट महोत्सव ऑफलाइन घ्यायचा की ऑनलाइन घ्यायचा याबाबतचा निर्णय आम्ही लवकरच घेऊ.
-----------------------------------------------