पुणे : अतिशय दुर्लक्षित असलेल्या घुबडाबद्दल संशोधन करत असलेल्या वन्यजीव शास्त्रज्ञ व वाइल्डलाइफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी (WRCS) च्या संचालिका डॉ. प्राची मेहता यांना इंटरनॅशनल आऊल सेंटर (यूएसए) तर्फे ‘आंतरराष्ट्रीय आऊल हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मेहता गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी घुबडांच्या संवर्धनाबाबत काम करत आहेत.
घुबड हे सर्वोच्च शिकारी पक्षी आहे, पण त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांच्या असामान्य दृष्टीमुळे आणि विचित्र आवाजामुळे, लोकांना अनेकदा घुबडांमध्ये अलौकिक शक्ती असल्याचा भ्रम होतो. घुबड हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण शिकारी पक्षी आहेत जे रात्री जगण्यासाठी विकसित झाले आहेत. भारतात घुबडांच्या ३४ प्रजाती आहेत. त्यांच्या निशाचर सवयी आणि गुप्त स्वभावामुळे त्यांना शोधणे आणि त्यांचे निरीक्षण करणे कठीण असते, त्यामुळे घुबडांवर फारसे संशोधन झालेले नाही. डॉ. मेहता यांनी खास फारेस्ट आऊलेट (रानपिंगळा) यावर काम केले आहे. फॉरेस्ट आउलेट (रानपिंगळा) हे भारतामध्ये आढळणारे एक दुर्मिळ घुबड आहे. ते फक्त भारतातच आढळते. रानपिंगळा ही एक लहान घुबड प्रजाती आहे, ज्याचा आकार 19 से.मी. आहे. बहुतेक घुबड निशाचर असतात, पण रानपिंगळा दिवसा सक्रिय असतो. सध्या मध्य भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि गुजरात, राज्यांमध्ये १२ ठिकाणी रानपिंगळा आढळतो. महाराष्ट्रात, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आणि नंदुरबार, नाशिक व तानसा अभयारण्यात रानपिंगळा आढळतो. अलीकडेच सिल्वासा येथे रानपिंगळा सापडल्याचे समोर आले होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रानपिंगळा आणि इतर घुबडांचा रेडिओ-टेलिमेट्री अभ्यास. घुबडांवर संशोधन करताना डॉ. प्राची मेहता यांनी घुबडांचा अभ्यास करण्यासाठी भारतात प्रथमच अनेक आधुनिक संशोधन तंत्रांचा वापर केला. त्यांनी घुबडांचे कलर बँडिंग, घुबडांच्या घरट्यांचे कॅमेरा ट्रॅप मॉनिटरिंग आणि घुबडांचे रेडिओ टेलीमेट्री यासारखे तंत्र वापरले. त्यामुळे आम्ही रानपिंगळा आणि इतर घुबडांच्या प्रजातींबद्दल महत्त्वाची वैज्ञानिक माहिती प्राप्त करू शकलो.