पुणे - पुण्यातील वाहतूककोंडी ही तशी नित्याचीच. किंबहुना पुणे व वाहतूककोंडी हे समीकरणच बनले आहे. त्यावर आता एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून मोहोर उमटली आहे. अमेरिकेतील चार संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतात सर्वाधिक वाहतूककोंडी होणाऱ्या शहरांमध्ये पुणे सातव्या क्रमांकावर आले आहे. त्या तुलनेत मुंबईची स्थिती अधिकच दयनीय असून या यादीत मुंबई दुसºया स्थानावर आहे.नॅशनल ब्युरो आॅफ इकॉनॉमिक रिसर्चअंतर्गत अमेरिकेतील चार संशोधकांनी भारतातील १५४ शहरांच्या वाहतुकीचा अभ्यास केला आहे. ‘मोबिलिटी अँड कंजक्शन इन अर्बन इंडिया’ या नावाने याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्वाधिक वाहतूककोंडी, सर्वाधिक वेगवान वाहतूक आणि सर्वाधिक संथ वाहतूक असलेल्या शहरांची यादीच अहवालात देण्यात आली आहे. या शहरांमधील वाहुतकीचा वेग आणि वाहतूककोंडीबाबत आधुनिक तंत्रज्ञान आणि गुगल मॅप्सच्या मदतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. विश्लेषणासाठी शहरांची लोकसंख्या, वाहनाची संख्या, दररोजचा सरासरी प्रवास, विकासदर, विस्तार, रस्त्यांची स्थिती असे विविध निकष विचारात घेण्यात आले. सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या शहरांच्या यादीत बंगळुरू शहर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल मुंबईचा क्रमांक लागतो. त्यानंतर दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद ही शहरे आहेत. या महानगरांच्या यादीत पुणे सातव्या स्थानी आहे, तर महाराष्ट्रातीलच नागपूर शहर सतराव्या क्रमांकावर आहे.सर्वाधिक संथ वाहतूक असलेल्या शहरांच्या यादीतही पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत पुणे २० व्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर कोलकाता तर बंगळुरू व हैदराबाद ही शहरे अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या यादीत पुणे व मुंबईसह महाराष्ट्रातील अकोला शहराचाही समावेश झाला आहे. देशातील पहिल्या दहा वेगवान शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश करण्यात आलेला नाही. या यादीत तमिळनाडू येथील राणीपेट शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे.रस्त्यांची वाईट स्थिती : अहवालात निरीक्षण नोंदवले1 वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची वाढत जाणारी संख्या हे वाहतूककोंडीचे ढोबळ कारण मानले जाते. पण त्यापेक्षा रस्त्यांची वाईट स्थितीही वाहतूककोंडी तसेच संथ वाहतुकीसाठी कारणीभूत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. मागील काही वर्षांत पुणे शहराचा वेगाने विकास झाला आहे. त्यामुळे दुचाकींबरोबरच चारचाकी वाहनांची संख्याही प्रचंड वेगाने वाढली.2प्रादेशिक परिवहन विभागाच्या अहवालानुसार, पुणे शहरात मार्च २०१८ अखेरीस दुचाकींची संख्या २७ लाखांच्या पुढे, तर चारचाकी वाहनांचा आकडा साडेसहा लाखांवर गेला आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची स्थिती मात्र सुधारताना दिसत नाही.3चौका-चौकामध्ये सिग्नल, सततची रस्तेखोदाई, अशास्त्रीय वेगनियंत्रक, बेशिस्त वाहनचालक, रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत विक्रेते यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. परिणामी वाहतूककोंडी, तसेच संथ वाहतूक नित्याची झाली आहे.
पुण्याच्या वाहतूककोंडीवर आंतरराष्ट्रीय मोहोर, अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासातून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 2:30 AM