लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात युवा नेमबाजांचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या हेतूने आॅलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगच्या स्पोटर््स प्रमोशन फाऊंडेशनने (जीएनएसपीएफ) आपल्या प्रोजेक्ट लीपसाठी आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टसह हातमिळवणी केली. प्रोजेक्ट लीप अंतर्गत पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील शुटींग रेंजमध्ये पहिले रायफल शिबिर पार पडले. यामध्ये देशातील विविध भागांतून २३ युवा प्रतिभावान नेमबाजांना आंतरराष्ट्रीय चॅम्पियन बनवण्यासाठी निवडण्यात आले. एकूण ५७ नेमबाजांमधून या अव्वल २३ नेमबाजांची निवड करण्यात आली आहे. या निवडण्यात आलेल्या २३ नेमबाजांमध्ये पुण्याचे सर्वाधिक १२ नेमबाज असून हैदराबाद व सिकंदराबादचे प्रत्येकी ३, जबलपूरचे दोन आणि मुंबई, भुवनेश्वर व गुजरातचे प्रत्येकी १ नेमबाज आहेत. यामध्ये १२ मुली आणि ११ मुलांचा समावेश आहे. जबलपूरची महिमा अग्रवाल आणि गुजरातची इलानेविल यांचा राष्ट्रीय ज्यूनिअर संघात समावेश आहे. नुकताच जर्मनीमध्ये झालेल्या ज्यूनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, शिबिरातून निवडण्यात आलेल्या खेळाडूंपैकी १२ खेळाडू एअर रायफल गटातील असून या सर्वांना स्लोवाकियाचे प्रशिक्षक एंटन बेलाक आणि गगन नारंग यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत पुण्यात बोलाविण्यात आले. बाकीचे ११ नेमबाज पिस्तुल गटातील असून हे खेळाडूही पुण्यात कोरियन प्रशिक्षक सियोनिल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
युवा नेमबाजांना देणार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:03 AM