पुणे : योग विषयाचा प्रसार होणे गरजेचे असून त्याचे बाजारीकरण होत असल्याची खंत स्वामी भारत भूषण यांनी व्यक्त केली. इन्स्टिट्यूट आॅफ योगा, लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एजुकेशनल ट्रस्ट, रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट, मल्टिव्हर्सिटी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि योग संस्था (सांताक्रूझ), महर्षी विनोद प्रतिष्ठान (पुणे), महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान (पुणे) यांच्या संयुक्त सहकार्याने चौथा पुणे जागतिक योग महोत्सव पौडजवळील कोलवण येथे नुकताच झाला. या वेळी भारत भूषण बोलत होते.
महोत्सवात प.पू. स्वामी गोविंददेव गिरी (भक्तियोग), प.पू. स्वामी भारत भूषण (षट्चक्र साधना ), प.पू. स्वामी आत्मा नम्बी (त्रिवेणी ध्यान), साध्वी आभा सरस्वती (मंत्रयोग आणि मंत्रोच्चार प्रशिक्षण), डॉ. विजय भटकर (व्यवस्थापन आणि योग), हंसाजी जयदेव योगेंद्र (योगशिक्षकाचे गुण), डॉ. संप्रसाद विनोद (शवासनामधील बारकावे) आदींनी मार्गदर्शन केले. योगगुरू म्हणवून घेण्यापेक्षा आपण योगसाधक म्हणून आयुष्यभर काम करावे, असे हंसाजी जयदेव यांनी स्पष्ट केले. भगवद्गीतेवर स्वामी गोविंददेव गिरी यांनी मार्गदर्शन केले. आत्मा नम्बी स्वामी यांनी त्रिवेणी ध्यानाची अनुभूती उपस्थित साधकांना दिली. डॉ. मुकुंद भोळे यांचे प्राणायाम लोकांना अभ्यासाचा विषय ठरला. शवासनामधील बारकावे आणि वेशिष्ट्ये डॉ. संप्रसाद विनोद यांनी विशद केली. या प्रसंगी डॉ. राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० उपस्थितांनी सामूहिक अग्निहोत्र केले आणि त्याची सर्वांगीण माहिती जाणून घेतली. निसर्गोपचारांमधील मातीलेपनाचे प्रात्यक्षिक आणि त्याचा विविध त्वाचारोगांवरील उपयोग डॉ. कुमुद जोशी यांनी विशद केला. डॉ. कुमुद जोशी यांना त्यांच्या योग - निसर्गोपचार ५० वर्षांच्या सेवेसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अनिल जयवंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विदुला शेंडे यांनी प्रास्ताविक केले.
नैराश्य, नकारात्मक जीवनतरुणांमध्ये नैराश्य भावना खूप वाढताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण जग हे एका नकारात्मक जीवन पद्धतीकडे ढकलले जात आहे. या सर्व गोष्टींमधून आपण सर्व जण बाहेर पडण्याचा मार्ग कायम शोधत असतो आणि ती संधी आपल्याला या योग महोत्सवामध्ये चालून आलेली आहे, असे संयोजक डॉ. विश्वास शेंडे यांनी स्पष्ट केले.