पुणे : घरात, ऑफिसमध्ये, शाळेत योगासने केल्याची अनेक उदाहरणे आपण बघतो. मात्र पुणे शहरात बुधवारी वेगळ्या प्रकारचा योग सादर करण्यात आला. योगासन दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगासन प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. चैताली ठोंबरे, निधी घोरपडे, लौकीका माळगे, मनिषा कर्डीले या युवतींनी पाण्यामध्ये योगासने सादर केली. त्याच वेळी तलावाच्या बाजूने सुमारे १०० विद्यार्थ्यांनी बाहेर योगासने सादर करत त्यांना साथ दिली.
ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करुन या योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक योग दिनानिमित्त इन्स्टिटयूट आॅफ योगा पुणे संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी फोनद्वारे उपस्थितांशी संवाद साधून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
आयोजक डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, ताण-तणाव आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात योग करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी दशेपासूनच योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगासने करावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पाण्यामध्ये आसने करणे अवघड असते, हा प्रकार परदेशात प्रचलित आहे. पुण्यामध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला.योगाचार्य विदुला शेंडे म्हणाल्या, डोक्यापासून ते पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला योगासनांमुळे व्यायाम मिळतो. पाण्यामध्ये केलेला अॅक्वा योगा हा वेगळ्या प्रकारचा व्यायामप्रकार आहे.