पुणे : कामकाज वेगवान व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेली ‘वाहन ४.०’ ही प्रणाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी (आरटीओ) डोकेदुखी ठरत आहे. कामकाजाच्या तुलनेत इंटरनेटचा वेग अत्यल्प असल्याने प्रणाली ठप्प होत आहे. इंटरनेटचा वेग अजूनही वाढत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून जवळपास दररोजच आरटीओतील कामकाज विस्कळीत होत असल्याचे चित्र शुक्रवारीदेखील कायम होते. वाहन प्रणाली एनआयसीने विकसित केली असून, त्याचा वापर पुण्यासह राज्यातील बहुतांश आरटीओमध्ये सुरू झाला आहे. प्रणालीची अंमलबजावणी करताना जाणवत असलेले दोष आणि इंटरनेटला पुरेसा वेग नसल्याने कामात येत असलेला अडथळा अशा दुहेरी कात्रीत येथील कामकाज सापडले आहे. या दोषांमुळे आरटीओतील कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कामकाज करावे लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी संगणकाच्या वेगाअभावी कामकाज शुक्रवारी ठप्प झाले. वाहन प्रणाली दाखल झाल्यापासून नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच झाली आहे. एकाच कामासाठी नागरिकांना तीन खिडक्यांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच वाहनचालकांची गर्दी परिवहन कार्यालयामध्ये होत आहे.
‘वाहन’ला इंटरनेट वेगाचा ब्रेक
By admin | Published: March 25, 2017 4:07 AM