लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रिक्षामधून फिरून रेकी केल्यानंतर घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून बाणेर व पाषाण येथील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
साकिब शौकतअली अन्सारी (वय २३, रा. बिजनौर, उत्तर प्रदेश), दानिश वारीस शेख (वय २२, रा. नागपूर चाळ), रिक्षाचालक सलमान ऐहसान अलवी (वय २६, रा. नागपूर चाळ, येरवडा) आणि वसिम शौकतअली अन्सारी (वय २४, रा. नागपूर चाळ, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख १० हजार रुपये असा ९ लाख ८ हजार रुपयांचा २ घरफोडीतील ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
आंतरराज्यीय टोळी रिक्षामधून फिरून रेकी करून घरफोडीचे गुन्हे करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शोध घेत असताना २४ ऑगस्ट रोजी सेनापती बापट रोडवरील शैलेंद्र सोसायटीजवळील स्वामी समर्थ रिक्षा स्टँड येथे रिक्षा उभी असून त्यामध्ये काही जण बसले आहेत. त्यांच्याकडे घातक शस्त्रे असून ते कोठेतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करणार आहेत, अशी बातमी मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस हवालदार राजस शेख, पोलीस अंमलदार दत्ता फुलसुंदर, प्रवीण भालचिम, राकेश खुनवे, अशोक शेलार, सागर वाघमारे, शीतल शिंदे यांनी तेथे छापा घालून चौघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांचा एक साथीदार मोहम्मद अन्सार हा गडबडीचा फायदा घेऊन पळून गेला. आरोपींकडे लोखंडी सुरा, सत्तुर, तलवार, कोयता, अत्याधुनिक फोल्डिंगची कटावणी, पोपट पान्हा, स्क्रू ड्रायव्हर इत्यादी घरफोडीची साधने, ९ मोबाईल हँडसेट व १ रिक्षा असा १ लाख १ हजार ३४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस कोठडीत घेऊन तपास करीत असताना त्यांनी पाषाण व बाणेर येथे दोन घरफोडी केल्याचे सांगून ती ठिकाणे दाखविली. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल होते.
हे सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील असून पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड, मुंबई व गुजरात येथे यापूर्वी त्यांनी गुन्हे केलेले आहेत.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने ही कामगिरी केली.