चिखली : जिल्हा बँकांना जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास शासनाने मनाई केल्यामुळे खातेदार बँकिंग सुविधेपासून वंचित राहत असल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता पसरली आहे.चिखली येथील जिल्हा बँकेत सकाळच्या सुमारास मोठ्या आशेने खातेदार पाचशे आणि हजारांच्या नोटा भरण्यासाठी, तसेच चालू नोटा काढण्यासाठी आले. परंतु, बँकेतील कर्मचाऱ्यांनी नोटा घेऊ शकत नसल्याचे कारण सांगितले. तसेच काही जण पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी पैसे काढण्यासाठी स्लीप भरली आणि काउंटरवर रोखपालाकडे दिली. परंतु, सदर रोखपालाने बँकेत रक्कम शिल्लक नसल्यामुळे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासकीय आदेशानुसार बँकेत पाचशे व हजारांच्या नोटा घेण्याचे बंद केले आहे, तर बँकेकडे कॅश नसल्यामुळे खातेदारांना रक्कम देणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.शहरात बऱ्याचशा महिला बचत गट चालवत आहेत. सदर बचत गटांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खाते आहे. बचत गट साधारणपणे महिन्याच्या १५ तारखेनंतर बचत करून बँकेत भरणा करतात. तसेच लगेचच ज्या महिलांना कर्ज हवे आहे, त्या महिलांना चेकद्वारे कर्ज दिले जातात. त्यामुळे जमा झालेली बचत गटाच्या खात्यात स्वीकारली जात नाही, बचत गटाच्या खात्यात पुरेशी रक्कम नाही आणि बँकेतही रोकड नसल्यामुळे बँकेत आलेल्या महिलांना आता काय करावे, असा प्रश्न पडला आहे.एटीएमसमोरील रांगा हटेना-पिंपरी : नोटाबंदीच्या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी बँक आणि एटीएमसमोरील रांगा मात्र ‘जैसे थे’ असल्याचेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ही ‘ आर्थिक आणिबाणी’ आणखी किती दिवस सहन करावी लागणार आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पाचशे व हजारांच्या नोटा मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्या. दोन दिवसांनंतर सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले खरे, पण नागरिकांच्या वाट्याला आतापर्यंत केवळ मनस्तापच आला आहे. आज या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी बँक व एटीएमसमोरील रांगा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. सहकारी बँकांना आवश्यक रकमेचा पुरवठा होत नसल्याने त्यांचे व्यवहारही सुरळीत होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पिंपरी, चिंचवड, निगडी परिसरातील निम्म्याहून अधिक एटीएम पुरेशी रोकड उपलब्ध नसल्याने बंदावस्थेत पाहायला दिसून येत होती. जी एटीएम सुरू आहेत, त्यांच्यासमोर भली मोठी रांग लागलेली असते. नोटांचा तुटवडा भासत असल्याने विमानातून रक्कम पाठविणार असल्याची घोषणा चार दिवसांपूर्वी सरकारकडून करण्यात आली. तसेच नाशिकच्या मुद्रणालयातून कोट्यवधी नोटा आरबीआयकडे पाठविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एवढेच नव्हे, तर वारंवार एकाच व्यक्तीने नोटा बदलू नये म्हणून ‘शाई’ची शक्कलही पुढे आली. या सर्व घोषणा केवळ नागरिकांचा रोष कमी करण्यासाठीच केल्या जातात की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आठ दिवसांपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासात फारसा फरक पडला नाही. (वार्ताहर)
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवहार ठप्प
By admin | Published: November 18, 2016 5:13 AM