बारामतीच्या जागेसाठी भाजपकडून ८ जणांच्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 05:29 PM2019-08-27T17:29:55+5:302019-08-27T17:30:33+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात महायुतीमधील कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बारामती: बारामती विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने आठ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ सहराततज्ज्ञ चंद्रराव तावरे हे देखील मुलाखतीला हजर होते. मात्र, कालपर्यंत इच्छुकांच्या यादीमध्ये नाव असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे मुलाखतीला गैरहजर राहिले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात महायुतीमधील कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपसह बारामतीच्या जागेवर शिवसेना व राष्ट्रीय समाज पक्षाने देखील दावा केला आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथील दादा जाधवराव सभागृहात बारामती, दौंड, इंदापूर, भोर, पुरंदर आदी तालुक्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी बारामती विधानसभेच्या जागेसाठी चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे, ज्ञानेश्वर कौले, राहूल तावरे, कुलभूषण कोकरे, गोविंद देवकाते, अभिजित देवकाते, सुरेंद्र जेवरे आदी मुलाखतीसाठी हजर होते. तर इच्छुकांमध्ये नावे असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्यासह नविन चेहºयांमध्ये प्रबळ दावेदार मानले जाणारे अविनाश मोटे, प्रशांत सातव गैरहजर राहिल्यानेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र युतीमध्ये बारामती विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. मागील विधानसभा निवडणुका युती, आघाडी विरहित पार पडल्या होत्या. सध्या वरिष्ठ पातळीवरून युती करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच सध्याच्या युतीच्या ठरलेल्या फॉम्युल्याप्रमाणे विजयी जागा सोडून जो पक्ष ज्या ठिकाणी क्रमांक दोनवर असेल ती जागा सबंधित पक्षाला सोडली जाणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार बाळासाहेब गावडे यांनी ६० हजाराच्या आसपास मतदान घेतले होते. त्यामुळे बारामती जागा भाजपला मिळावी. अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नितिन भामे यांनी सांगितले. तर एकीकडे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी देखील आपला परंपरागत मतदार संघ न सोडण्याचा चंग बांधला आहे. त्याचप्रमाणे महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आपली या मतदार संघात अधिक ताकद असल्याचा दावा करीत बारामतीची जागा रासपलाच मिळावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान सासवडे येथे पार पडेलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये पुरंदर तालुक्यातून सर्वाधीक म्हणजे १८ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्याखालोखाल इंदापूर - १३, भोर- १३, दौंड-५ आदींनी मुलाखती दिल्या आहेत.