पुणे : शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत हास्यास्पद असल्याचं वक्तव्य पुण्यातील मनसे कडून करण्यात आलंय. मनसे चे प्रवक्ते आणि सरचिटणीस हेमंत संभूस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती नंतर प्रतिक्रिया दिली आहे.
संभूस म्हणालेत, "मुलाखत देणारे, मुलाखत घेणारे आणि मुलाखत छापणारे सगळेच घरचे आहेत. शिवसेना ही कौटुंबिक संघटना आहे की पक्ष आहे? शिवसेनेनं आता हिंदुत्वाबाबत बोलू नये. शिवसेननं हिंदुत्व सोडलेलं आहे. मी या मुलाखतीचा हाच सारांश काढलेला आहे 'न झेपलेलं हिंदुत्व'.
मध्यंतरी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनीही मनसे म्हणजे अगरबत्ती असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना संभूस म्हणाले, " आम्हाला अगरबत्ती म्हणून हिणवण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यावं. भगिनी आहात म्हणून फार बोलत नाही. पण त्यांनी लक्षात ठेवावं की अगरबत्ती जर बॉम्बला लागली तर बॉम्ब फुटतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं."
एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "माझा मनसे सैनिक मला सर्वात प्रथम आहे. संघटना वाढीसाठी जर एखादी गोष्ट पोषक ठरत असेल तर ते आमच्यासाठी चांगलंच आहे." असं जर होणार असेल तर कुठल्याही मनसैनिकाची नाराजी असेल असं मला वाटत नसल्याचंही यावेळी संभूस म्हणालेत."गृहमंत्री पद मिळणार असेल तर शिंदे - फडणवीस यांच्या सोबत जाण्याबद्दल विचार करू..." असं अमित ठाकरे बोलल्याच्या अफवा काही दिवस आधी पसरल्या होत्या. त्यावर बोलताना संभूस यांनी हे स्पष्टीकरण दिलंय.
"मुळात हिंदुत्व खायचा पदार्थ नव्हे. हिंदुत्व एक विचार आहे. एक संस्कृती आहे. ज्याला ती झेपते त्यानेच ते स्वीकारावं. आम्ही हिंदुत्ववादी बोलून होत नाही. तर ते प्रकर्षाने दाखवावं लागतं, लोकांमध्ये रुजवावं लागतं." असंही हेमंत संभूस यांनी सडेतोडपणे सांगितलं.''