पुणे : दारुचे व्यसनातून नशा जास्त झाली असताना एकाने तिच्या ६ वर्षाच्या मुलाला पळवून नेले. पोलिसांनी केलेल्या तपासात या मुलाला थेट गुलबर्गा येथे नेण्यात आल्याचे आढळून आले. पुणेपोलिसांनी गुलबर्गा पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करुन मुलाची सुटका केली. इक्बाल हसन शेख (वय ३२, रा. पेडगाव, जि. कोल्हापूर, सध्या रा. गुलबर्गा रेल्वे स्टेशनजवळ, कर्नाटक) असे मुलाला पळवून नेणाºयाचे नाव आहे.
याबाबत एका ४० वर्षाच्या महिलने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पिंपरी येथील राहणार्या आहेत. त्यांना दारूचे व्यसन आहे. त्या आपल्या ६ वर्षाच्या मुलासह ९ जानेवारी रोजी पुणे स्टेशन येथे आल्या होत्या. तेथे त्यांना इक्बाल शेख भेटला. फिर्यादीने त्याच्याबरोबर शिल्लक असलेली दारु पुन्हा पिली. त्यामुळे त्यांना नशा जास्त झाल्याने त्या रात्री अकरा वाजता झोप लागली. त्यानंतर पहाटे २ वाजता त्यांना जाग आल्यावर आपल्याबरोबर आपला मुलगा नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बंडगार्डन पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात एक संशयित आढळून आला. तांत्रिक तपासातून चोरटा मुलाला गुलबर्गा येथे घेऊन गेल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. गुलबर्गा पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक करुन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी बंडगार्डन पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. शेख याने या मुलाला का पळवून नेले होते, हे त्याच्या चौकशीनंतर पुढे येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाले तपास करीत आहेत.