लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: साप किंवा नाग म्हटलं की आपण घाबरतो, पण या सापाकडून चावून घेण्याची नशादेखील केली जात आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, असे तरुण या नशेकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. पुणे शहरातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारची नशा केली जात आहे. पूर्वीच्या काळी जंगलांमध्ये आदिवासी लोक अशी नशा थोडीफार करत असल्याचे उल्लेख आहेत.
आज काही तरी थ्रिल करायचे म्हणून स्नेक बाइट करून त्याची नशा तरुणांच्या अंगी भिनवली जात आहे. ही नशा एक-दोन दिवस राहत असल्याचे सांगितले जाते. नशेसाठी निमविषारी सापांचा वापर केला जातो. त्यामध्ये मांजऱ्या, हरणटोळचा समावेश आहे. बिनविषारी साप कवड्या, दिवडचे पिल्लू आदी सापही वापरले जातात.
बिनविषारी साप कवड्या, दिवडचं पिल्लू या सापांना अमली पदार्थ असलेल्या बरणीत ठेवले जाते. त्या सापाला अमली पदार्थ चिकटलेला असतो. नंतर नशा करणाऱ्या व्यक्तीला त्याचा बाइट दिला जातो. - आनंद अडसूळ, अध्यक्ष, ॲनिमल स्नेक प्रोटेक्शन सोसायटी, पुणे
एका स्नेक बाइटला पाच हजारांपेक्षा अधिक पैसे घेतले जातात. हा स्नेक बाइट नेमका कुठे मिळेल, याविषयी खूप गुप्तता पाळली जाते. तो प्रकार मी पाहिलेला आहे. - शुभम, प्रत्यक्षदर्शी