पुणे : बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेचा सक्रिय सदस्य अरुण भेलके हा भूमिगत नक्षलवादी कॉ. एम. ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे यांच्यासोबत असायचा. तसेच त्याची पत्नी कांचन भेलके ही नक्षल भागातील संघटनेच्या सदस्यांना औषधोपचाराचे काम करत असे. अशी साक्ष गडचिरोलीतील शरणागत नक्षलवादी गोपी याने बुधवारी न्यायालयात दिली. त्याने भेलके याला न्यायालयासमोर ओळखले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मिलिंद तेलतुंबडे हे भूमिगत असून एल्गार व माओवादी संबंध प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. भेलकेने मुंबईत वास्तव्यास असताना आधार कार्डच्या अर्जावर एका नगरसेवकाच्या कार्यालयाचा पत्ता टाकून आदित्य पाटील नावाचे आधार कार्ड मिळविल्याचे तपासातून पुढे आले आहे. चंद्रपूर येथील बेकायदेशीर प्रतिबंधक हालचालींच्या गुन्ह्यात दोघांना जामीन मिळाला आहे. मात्र पुढील तारखांना हजर न राहता दोघेही नाव बदलून पुण्यात राहत होते. त्यांची माहिती मिळताच एटीएसने त्यांना दोन सप्टेंबर 2014 मध्ये अटक केली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळावा, अशी मागणी करणारा अर्ज कांचन हिने केला होता. न्यायालयाने मात्र तो फेटाळला आहे. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
* गोपी ऊर्फ निरंगीसाय दरबारी मडावी याची मंगळवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात साक्ष झाली. कांचन भेलके आजारी असल्याने तिला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. घरात झालेल्या भांडणामुळे गोपी नक्षलवादी संघटनेत सहभागी झाला. तेव्हापासून ते शरण गेल्यापर्यंतचा प्रवास त्याने न्यायालयास सांगितला. त्याने दिलेल्या जबाबास बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी विरोध केला. गोपी हा शरण आल्यापासून पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तो पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे साक्ष देत आहे, असा युक्तिवाद नहार यांनी केला. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील विकास शहा या खटल्याचे कामकाज पाहत आहे.